मारबतीच्या साक्षीने चित्रपटाचा मुहूर्त

मारबतीच्या साक्षीने चित्रपटाचा मुहूर्त

मिरवणुकीदरम्यान आज होणार चित्रीकरण

नागपूर - कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करणारी पूतना मावशी आणि इंग्रजांना सहकार्य करणारी बाकाबाई यासारख्या विकृत मनोवृत्तीचे प्रतीक म्हणून मारबत मिरवणुकीला प्रारंभ झाला. कालौघात मारबतीशी श्रद्धा जोडली गेली. आता तर मारबतीकडे नवसही बोलले जाऊ लागले आहे. यंदा तर थेट मराठी चित्रपटाचा मुहूर्तच मारबतीच्या साक्षीने झाला. मंगळवारी निघणाऱ्या मारबत मिरवणुकीदरम्यान चित्रपटाचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे.

इंग्रजांच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी १३७ वर्षांपूर्वी नागपुरात मारबत मिरवणुकीला प्रारंभ झाला. हळूहळू दुष्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून बडगेही मिरवणुकीत सहभागी होऊ लागले. हळूहळू पिवळी अणि काळी या दोन्ही मारबतींसोबत श्रद्धा जोडली गेली. आता नवसाला पावणाऱ्या म्हणून दोन्ही मारबतींचे श्रद्धेने पूजन केले जाते. वस्त्र आणि प्रसादही चढविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काळानुसार मारबतीसोबत नवनव्या आख्यायिकाही जोडल्या जाऊ लागल्याने ही ऐतिहासिक परंपरा सर्वदूर पसरली आहे. ही महती आता चित्रपट निर्मात्यांनाही खुणावणारी ठरली. सोमवारी पिवळ्या मारबतीसमोर ‘बकाल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त झाला. मंगळवारी मिरवणुकीदरम्यान काळी-पिवळी मारबतीची गळाभेट होत असताना नेहरू पुतळा चौकात व नंतर गोळीबार चौकात या चित्रपटाचे चित्रीकरणही होणार असल्याची माहिती पिवळ्या मारबतीची परंपरा जोपासणाऱ्या तन्हाने तेली समाजाचे मार्गदर्शक जयवंत तकीतकर यांनी दिली.
 

‘एमटीडीसी’चा उत्सव गेला कुठे?
तऱ्हाने तेली समाजाने १३३ वर्षांपासून जोपासलेली पिवळ्या मारबतीची परंपरा उपराजधानीचे वैशिष्ट्य ठरली आहे. सर्वदूर ख्याती असलेल्या या परंपरेकडे पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने एकच वर्ष मारबत महोत्सव घेतला. चिंचोळ्या गल्लीतच कार्यक्रम पार पडले. भरगच्च गर्दीचा फोटो काढून घेतला. आता हा फोटो एमटीडीसीकडून वापरला जातो. प्रत्यक्षात मात्र महामंडळाने उत्सवापासून फारकत घेतली आहे. या प्रकाराबाबत जयवंत तकीतकर यांनी खंत व्यक्त केली. उपराजधानीचे हे वैभव सर्वदूर पोहोचण्यासाठी एमटीडीसीने नियमित सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com