एमएसडब्ल्यूच्याही परीक्षेत घोळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नागपूर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीबीए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्‍नपत्रिका वितरित केल्याचे प्रकरण ताजे असतानाच याची  एमएसडब्ल्यूच्या परीक्षेतही पुनरावृत्ती झाली. परीक्षेला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी हा घोळ लक्षात आणून दिल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाचला. 

नागपूर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीबीए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्‍नपत्रिका वितरित केल्याचे प्रकरण ताजे असतानाच याची  एमएसडब्ल्यूच्या परीक्षेतही पुनरावृत्ती झाली. परीक्षेला सुरुवात होताच काही विद्यार्थ्यांनी हा घोळ लक्षात आणून दिल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाचला. 

वेळेवर विद्यापीठातून नव्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका मागविण्यात आल्या व यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त अर्धा तासही देण्यात आला. या प्रकरणातून पुन्हा एकदा विद्यापीठाचे परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतचे गांभीर्य पुढे आले आहे. २० मार्चला बीबीए तृतीय वर्षाचा ‘इंटरप्रुनअरशिप डेव्हलपमेंट’च्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली. उद्या, बुधवारी (ता.४)  विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील हे प्रकरण सुटण्यापूर्वीच ‘सेम मिस्टेक’ झाल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवार (३ मार्च) पासून एमएसडब्ल्यूच्या दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षांना सुरुवात झाली. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या केंद्रावर विद्यार्थ्यांचा दुपारी २.३० ते ५.३० वाजतादरम्यान ‘समुदाय संघटन’ विषयाचा पहिला पेपर होता. परीक्षा केंद्रावर वेळेवरच पेपरला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्‍नपत्रिका पडताच त्यांना ‘ओल्ड कोर्स’ची प्रश्नपत्रिका असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासंबंधी पर्यवेक्षकांना चूक लक्षात आणून दिली. मात्र, एका वर्गखोलीतील पर्यवेक्षिकेने माझे काम फक्त प्रश्नपत्रिका वितरित करणे आहे, मी याबाबत काही करू शकत नाही, तुम्हीही जे मिळाले तेच पेपर सोडव असा शेरा दिला. 

पर्यवेक्षिकेच्या या वागणुकीने वर्गखोलीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, वेळेवर परीक्षाप्रमुखांनी हस्तक्षेप करीत चूक मान्य केली व विद्यार्थ्यांना अर्ध्या तासात नव्या प्रश्‍नपत्रिका पुरविण्याचे आश्वासन दिले.
परीक्षा केंद्रावर एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाचे शेकडो विद्यार्थी परीक्षा देत होते. या सर्वच विद्यार्थ्यांना ओल्ड कोर्सच्या प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या. प्रकार लक्षात आणून देऊनही काही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला. वाढता गोंधळ लक्षात घेता केंद्रावरील परीक्षा प्रमुखांनी विद्यार्थ्यांपुढे येत चूक मान्य केली व जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परत घेतल्या. 

परीक्षा केंद्रावर नवीन आणि जुन्या अशा दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पुरविण्यात येतात. त्यामुळे केंद्रांनी विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमानुसार यादी काढून त्या वितरित करणे आवश्‍यक आहे. यासंबंधी आधीच सर्व केंद्रांना सूचना दिली जाते. मात्र, यात केंद्राचीच चुकी असल्याचे दिसून येते.  
- डॉ. नीरज खटी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

Web Title: nagpur vidarbha news MSW exam

टॅग्स