विद्यापीठ तपासणार मुंबई विद्यापीठाचे पेपर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मदतीचा हात : शिवाजी, धनवटेमध्ये होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन  

नागपूर - पंधरा दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नसल्याच्या कारणावरून राज्यपालांच्या कार्यालयाने प्रशासनाला चांगलेच खडसावले. तरीही निकाल वेळेवर लागत नसल्याने नागपूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. 

मदतीचा हात : शिवाजी, धनवटेमध्ये होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन  

नागपूर - पंधरा दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नसल्याच्या कारणावरून राज्यपालांच्या कार्यालयाने प्रशासनाला चांगलेच खडसावले. तरीही निकाल वेळेवर लागत नसल्याने नागपूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. 

वाणिज्य अभ्यासक्रमातील दोन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आठ दिवसांत करून देणार आहे. उद्या शुक्रवारपासून (ता.२१) नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेज आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयात खास तयार करण्यात आलेल्या केंद्रात ऑनस्क्रीन मूल्यांकनास सुरुवात होईल. 

मुंबई विद्यापीठात निकाल वेळेवर येत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. या प्रकरणाची दखल राज्यपाल कार्यालयाने घेतली. कुलपती  कार्यालयाने कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना खडसावत ३१ जुलैच्या आत सर्व निकाल लावण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, अद्याप वाणिज्य शाखेसह इतर विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे निकाल वेळेत लागतील काय? याबद्दल शाशंकता आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची डॉ. देशमुख यांच्याशी दिल्लीत भेट झाली. या भेटीत यावर चर्चा होऊन नागपूर विद्यापीठाने मुंबई वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जलद गतीने करण्याचे आश्‍वासन दिले. 

यानंतर डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती तयार करण्यात आली. या समितीमार्फत वाणिज्य विषयातील २५० प्राध्यापक मूल्यांकनाचे काम करणार आहेत.  त्यासाठी धनवटे नॅशनल कॉलेज आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचा वापर करण्यात येईल. ऑनस्क्रीन मूल्यांकनाद्वारे पेपर तपासले जाणार असून आठ दिवसांत हे काम पूर्ण करून मुंबई विद्यापीठाकडे त्याचा डाटा पाठविण्यात येईल. जवळपास दोन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन नागपुरात होणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या निकालांना उशीर होत आहे. वाणिज्य शाखेचे बरेच निकाल शिल्लक  नसल्याने मदतीचा हात देण्यात येत आहे. शुक्रवारपासून आठ दिवसांत मूल्यांकन पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. डॉ. तायवाडे यांच्या नेतृत्वात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रीन तपासणी करणार आहेत. 
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

Web Title: nagpur vidarbha news mumbai university paper cheaking by nagpur university