आठ उमेदवारांचे भाग्य आज ‘ईव्हीएम बंद’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नागपूर - महापालिकेच्या प्रभाग ३५ मधील अ प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागेसाठी  उद्या, ११ ऑक्‍टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासनाने या पोटनिवडणुकीसाठी आजच निवडणूक अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी वर्ग रवाना केला. प्रभागातील ४३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून पोलिसांचा बंदोबस्तही करण्यात आला.

नागपूर - महापालिकेच्या प्रभाग ३५ मधील अ प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागेसाठी  उद्या, ११ ऑक्‍टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासनाने या पोटनिवडणुकीसाठी आजच निवडणूक अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी वर्ग रवाना केला. प्रभागातील ४३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून पोलिसांचा बंदोबस्तही करण्यात आला.

फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून निवडून आलेले भाजपचे सदस्य नीलेश कुंभारे यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे अ प्रवर्गातील जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी उद्या मतदान होत असून प्रभागातील ५७ हजार ६९३ मतदार आठ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहे. बुधवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू राहील. मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधीपुढे ‘मॉक पोल’ घेण्यात येईल. त्यानंतर मतदानाला सुरुवात होईल. या निवडणुकीसाठी आज दुपारी दोन वाजता ईव्हीएम तसेच इतर साहित्य मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले.  संपूर्ण ४३ मतदान केंद्रांवर पोलिसांचाही कडेकोड बंदोबस्त करण्यात आला.

मतदानाची टक्केवारीबाबत उत्सुकता 
फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत या प्रभागात ५२ टक्के मतदान झाले होते. परंतु, ही पोटनिवडणूक असून नागरिकांचीही उत्सुकता नसल्याने मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे कुणाला फायदा होतो, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

भाजप-काँग्रेस संघर्ष 
या प्रभागातून भाजपचे संदीप गवई, काँग्रेसचे पंकज थोरात, बसपच्या नंदा झोडापे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे शशिकांत नारनवरे, अपक्ष वंदना जीवने, मनोज इंगोले, गौतम कांबळे,  सुनील कवाडे रिंगणात आहेत. परंतु, भाजपचे संदीप गवई व काँग्रेसचे थोरात यांच्यातच चुरस रंगणार असल्याचे समजते. 

उद्या मतमोजणी 
१२ ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सीताबर्डी येथील बचतभवन येथे होणार आहे. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मतमोजणी केंद्रावर केवळ उमेदवार किंवा  त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news municipal election