पालिकेचा उन्हाळा कायम!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - महापालिकेने उन्हाळ्यात दहाही झोनची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत केली होती. उन्हाळा लोटून पावसाळाही संपुष्टात येणार आहे. मात्र, कामकाजाची वेळ पूर्ववत न केल्याने महापालिकेच्या लेखी अद्याप उन्हाळाच असल्याचे दिसून येत आहे. महापालिका उन्हाळ्यातच असल्याने झोनमध्ये कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी मनस्ताप सहन करावा लागत असून कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. 

नागपूर - महापालिकेने उन्हाळ्यात दहाही झोनची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत केली होती. उन्हाळा लोटून पावसाळाही संपुष्टात येणार आहे. मात्र, कामकाजाची वेळ पूर्ववत न केल्याने महापालिकेच्या लेखी अद्याप उन्हाळाच असल्याचे दिसून येत आहे. महापालिका उन्हाळ्यातच असल्याने झोनमध्ये कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी मनस्ताप सहन करावा लागत असून कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. 

नागपूरकरांचा उन्हाच्या झळापासून बचाव करण्यासाठी महापालिकेने उन्हाळ्यात सर्व झोनच्या कामकाजाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत केली होती. या निर्णयाचा त्यावेळी कर्मचाऱ्यांनी विरोधही केला होता. परंतु, नागरिकांच्या सुविधेला महापालिकेने प्राधान्य दिले होते. आता मात्र महापालिकेला नागरिकांच्या सुविधांचा विसर पडल्याचे चित्र आहे. उन्हाळा संपुष्टात येऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, पावसाळाही परतीच्या मार्गावर आहे. मात्र, हा निर्णय अद्याप कायम आहे. त्यामुळे चार वाजतानंतर झोनमधील कर्मचारी घरी निघून जात आहेत. कर्मचारी सकाळी आठ वाजता येतात. परंतु, त्यावेळी झोन कार्यालयात कुणीही नागरिक कामानिमित्त येत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. सकाळी अकरानंतरच नागरिक बांधकाम मंजुरी किंवा इतर कामांसाठी झोनमध्ये येतात. काही नागरिक दुपारी चारनंतर येतात. ही वेळ कर्मचाऱ्यांची घरी निघून जाण्याची असते. त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांत अनेकदा वादही  निर्माण झाले. कर्मचाऱ्यांना घरी लवकर जाण्यास मिळत असल्याने सध्या तरी वेळ बदलविण्याबाबत ते मौन आहे. परंतु, यात नागरिकांचे हाल होत आहे. अनेकदा कामे करण्यासाठी नागरिक दुपारी दोन-तीन वाजता येतात. कामे पूर्ण करण्यापूर्वीच चारची वेळ होताच, कर्मचारी निघण्याची तयारी करतात. त्यामुळे नागरिकांची कामे दुसऱ्या दिवसावर ढकलली जात आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ बदलवून पूर्ववत करण्यासाठी नवनिर्माण को-ऑप. हाउसिंग सोसायटी नागरी कृती समितीने आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. 

प्रामाणिक कर्मचाऱ्यांना फटका 
महापालिकेत कामचुकार कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. परंतु, यात काही प्रामाणिक कर्मचारी आहेत. सकाळी ८ वाजतापासून झोन कार्यालयात आल्यानंतरही वरिष्ठ तसेच नागरिकांसाठी ते ड्यूटीनंतर अर्थात चार वाजेनंतरही झोनमध्ये थांबतात. प्रामाणिकपणाचा मनस्ताप त्यांना सोसावा लागत असून अधिकारीही ऐन घरी निघतेवेळी कामे करायला लावत असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news municipal time table