मुन्ना यादवला तूर्तास दिलासा नाहीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

नागपूर - फटाके फोडण्याच्या वादातून यादव कुटुंबीयांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारीच्या घटनेतून अटक वाचविण्याकरिता राज्य कामगार महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुन्ना यादव याची धडपड सुरू आहे. मुन्ना यादवने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून, याप्रकरणी मंगळवारी (ता. १२) न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

तसेच राज्य सरकारला नोटीस बजावत १९ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. मुन्नाचा मुलगा करण व त्याचे साथीदार मंगल यादव यांच्या घरासमोर फटाके फोडत होते. दुसरीकडे फटाके फोडा, असे मंगलची बहीण मंजू यादव या करणला म्हणाल्या. येथूनच वादाला सुरुवात झाली होती. ही घटना २१ ऑक्‍टोबर रोजी रात्री ९.३० वाजतादरम्यान घडली होती.

दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी होत असताना वेळीच पोलिस पोहोचले. परिस्थिती हाताळली नसती तर मंगल यादव गटातील एखाद्याचा मुडदाच पडला असता, अशीही चर्चा आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून, शीघ्र कृतिदल व पोलिस या भागात तैनात करण्यात आले होते.

पोलिसांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव गटाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुन्ना यादव गटाने केलेल्या  सशस्त्र हल्ल्यात मंगल यादव, प्रदीप यादव, करण मुदलिया, सागर यादवसह पाच जण जखमी  झाले होते.

याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुन्नाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे अटक टाळण्यासाठी मुन्ना यादवने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुन्नाचा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभाग नसल्याचा युक्तिवाद करत प्रत्यक्षात त्याने मारहाण केली नसल्याच्या मुद्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. लोखंडी रॉड, तलवारने मारहाण केल्याचा मुद्दा एफआयआरमध्ये नमूद करण्यात आला आहे. परंतु, मारहाण झालेल्या व्यक्तींच्या इजांचा  अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असेदेखील सांगण्यात आले. या सर्व बाबी लक्षात मुन्नाला तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्याची विनंती करण्यात आली. परंतु, न्यायालयाने विनंती फेटाळत राज्य सरकारला नोटीस बजावली. मुन्ना यादवतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. उदय डबले यांनी सहकार्य केले.

Web Title: nagpur vidarbha news munna yadav bell cancel