नागपूर नव्हे क्राइमपूर

नागपूर नव्हे क्राइमपूर

नागपूर - लॉटरी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण-हत्याकांड ताजे असतानाच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालाने नागपूर हे ‘क्राइम कॅपिटल’ असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार सर्वाधिक गुन्हे घडणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचा दुसरा क्रमांक आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये उपराजधानीत गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचा अनुभव सर्वसामान्यांसह व्हीआयपींनादेखील येतोय. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘माझ्या शहराला बदनाम करू नका हो’ असे म्हणत नागपूर सुरक्षित असल्याचा दावा करीत असतानाच दुसरीकडे एनसीआरबीने मात्र नागपूर जरादेखील सुरक्षित नसल्याचे सत्य पुढे आणले आहे. कोचीपाठोपाठ नागपूरमध्ये सर्वाधिक गुन्हे घडत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१४ मध्ये २७ हजार ६६६, तर २०१५ मध्ये ३३ हजार ११३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यात वाढ होऊन २०१६ मध्ये ४२ हजार ८६६ चा आकडा गाठला आहे. टक्केवारीचा विचार करता ही वाढ ५.३ टक्के इतकी आहे. एनसीआरबीने  नुकताच १९ शहरांची आकडेवारी सादर केली. यानुसार, एकूण गुन्हेगारी वाढलेल्या पाच शहरांचा उतरता क्रम कोची, नागपूर, चेन्नई, दिल्ली, सुरत असा आहे.

भारतीय दंडविधानाअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्यादेखील वाढली आहे. २०१६ मध्ये  ही संख्या ६९३ इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यात २.३ टक्के इतकी वाढ झाली आहे. 

खुनाचे प्रमाण वाढले
खुनाच्या संख्येत वाढ झाली असून सर्वाधिक खून होणाऱ्या शहरांमध्येही नागपूर दुसऱ्या  स्थानावर आहे. मागील वर्षी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या आर्किटेक्‍ट एकनाथ निमगडे  यांचा खून असो वा दिवसाढवळ्या होणारे फायरिंग असोत, शहरातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्था अपयशी ठरल्याचे या अहवालाने सिद्ध केले आहे.

अहवालातील आकडेवारीवर नजर टाकल्यास उपराजधानी आता महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. वर्षागणिक महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्यातल्या घरातीलच व्यक्तीने केलेला अत्याचार, लैंगिक शोषण यांचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे भविष्यात नागपूर अधिकाधिक असुरक्षित होणार असल्याचे संकेत या अहवालाने दिले आहे. २०१५ मध्ये महिलांवरील गुन्ह्यांची संख्या १ हजार ३१२ इतकी होती. ही संख्या २०१६ मध्ये १ हजार ३७९ झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com