आरोग्य, शिक्षणापेक्षा खेळ, मैदानावर भर

महाल - अर्थसंकल्पाची प्रत असलेली बॅग घेऊन कारमधून उतरताना स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव.
महाल - अर्थसंकल्पाची प्रत असलेली बॅग घेऊन कारमधून उतरताना स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव.

नागपूर - स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य व शिक्षणाच्या तुलनेत यंदा क्रीडा विभागाला झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे. सर्व योजना जुन्याच असून महिलांसाठी विशेष शौचालयांच्या निर्मितीसाठी तरतूद त्यांनी केली. शहरात नवे पुतळे उभारण्याचा संकल्प त्यांनी केला असून, उद्यानांद्वारे हिरवळ आणण्याचाही त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी सर्वस्तरांतील नागरिकांचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आल्याचा दावा केला. 

मात्र, अनेक महत्त्वाच्या विभागांसाठी तरतुदीत मोठी तफावत दिसून येत आहे. मुळात शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी महापालिकेकडून दिली जाणारी आरोग्य सेवा व शिक्षणासाठी अल्प तरतूद असून, त्या तुलनेत क्रीडा विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके वाटप, प्राथमिक शाळांची दुरुस्ती तसेच नवीन बांधकाम, माध्यमिक शाळांची दुरुस्ती व नवीन बांधकाम, शिष्यवृत्ती, विद्यार्थिनींसाठी सायकल बॅंक, ॲबॅकस प्रशिक्षण आदींसाठी जाधव यांनी २ कोटी ४५ लाखांची तरतूद केली आहे. प्रभाकर दटके स्मृती रोगनिदान केंद्राचा विस्तार, महिलांसाठी विशेष शौचालये, सुलभ शौचालयांसाठी तसेच दवाखाने दुरुस्तीसाठी ४.५० कोटींची तरतूद केली.

क्रीडा विकासासाठी ४.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शाळा डिजिटल करण्यासाठी सीएसआरवर भर देण्यात आला तर समाज मंदिरे, व्यायाम शाळेच्या निर्मितीसाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सहा नवे पुतळे तयार करण्यात येणार असून, त्यासाठी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. जुन्या पुतळ्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली. याशिवाय मागील जुन्याच योजनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला. यात नागनदी, तलावांचे पुनरुज्जीवन, खाऊ गल्ली, झोन कार्यालयाची निर्मिती, अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी, अग्निशमन विभागाचे बळकटीकरण, शहर वाहतूक योजनेसाठी पार्किंग, परिसर पालकत्व योजना, जुने पथदिवे बदलून एलईडी लाईट्‌स लावणे यासोबतच सिमेंट रस्त्यांची कामे, नवीन टाऊन हॉल तयार करणे, समाजभवनाची निर्मिती अशा अनेक जुन्या योजनांचा समावेश आहे.

मूल्यांकन न झालेली १ लाख घरे
शहरातील एकूण मालमत्तांपैकी १ लाख घरांचे मूल्यांकन झाले नाही. या मालमत्तांचे मूल्यांकन करून नव्याने कर आकारण्यात येईल. सप्टेंबरपर्यंत या मालमत्तांचे मूल्यांकन करून मालमत्ता कराचे लक्ष्य गाठले जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जास्तीत जास्त एरिअर्सची रक्कम वसुलीवर भर दिला जाईल. याशिवाय थकीत करासाठी आतापर्यंत मालमत्ता जप्त केली जात होती. परंतु आता या मालमत्तांचा लिलाव करून कर घेतल्या जाईल, अशा कठोर निर्णयाच्या अंमलबजावणीचेही त्यांनी नमूद केले. 

स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अर्थपूर्ण आहे. नव्या योजनांऐवजी जुन्या योजना पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला असून सर्व विभागांनी प्रयत्न केले तर उत्पन्नाचे लक्ष्य गाठणे सहज शक्‍य होईल. 
- नंदा जिचकार, महापौर. 

जाधव यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक त्रुटी असून चर्चेदरम्यान त्याचा ऊहापोह करण्यात येईल. अनेक बाबीसाठी त्यांनी तुटपुंजा निधी ठेवला आहे. करावर दोन टक्के दंड आकारण्याची तरतूद रद्द करणे आवश्‍यक आहे. 
- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते.

नागपूर महोत्सव नोव्हेंबरमध्ये 
शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा नागपूर महोत्सव यंदा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचा मानस जाधव यांनी व्यक्त केला. महोत्सवासाठी मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी दोन कोटी दिले होते. यंदाही जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच प्रत्येक झोन कार्यालयांना ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. 
 

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये 
नरसाळा-हुडकेश्‍वरच्या विकासासाठी ५ कोटींची तरतूद
पुनापूर, पारडी, भरतवाडा, दाभा, जयताळा, चिचभुवन, सोमलवाडा, झिंगाबाई टाकळीसाठी ७.७५ कोटी. 
रस्ते दुरुस्तीसाठी १०० कोटी
नासुप्रने नियमित केलेल्या वस्त्यांमध्ये विकासकामांसाठी
१५ कोटी
डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी २ कोटी 
४५ हजार झाडे लावणार 
कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्प
दहनघाट व कब्रस्तान निर्मितीसाठी ५ कोटी तर दुरुस्तीसाठी ३.५ कोटींची तरतूद 
झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप
दुर्बल घटक योजनेसाठी ४४.३७ कोटी
लाडली लक्ष्मी योजनेसाठी २ कोटी 
दिव्यांगांना मदतीसाठी १ कोटी
महिला उद्योजिका मेळाव्यात स्टॉल वाढविणार 
बीओटीवरील प्रकल्प
ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाची निविदा ऑगस्टमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com