नाट्य परिषदेच्या धर्तीवर व्हावे सबलीकरण

नाट्य परिषदेच्या धर्तीवर व्हावे सबलीकरण

नागपूर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही एक स्वतंत्र यंत्रणा असली तरी हौशी आणि व्यावसायिक कलावंतांच्या सबलीकरणासाठी सरकारी योजना आहेत. मात्र, आठ महिने शेती आणि चार महिने नाटकांमध्ये काम करणाऱ्या झाडीपट्टीतील कलावंतांना सरकारचे कुठलेही पाठबळ नाही. त्यामुळे परिषदेच्या धर्तीवर झाडीपट्टी रंगभूमीचे सबलीकरण व्हावे, असा विचार आता पुढे येऊ लागला आहे.

शंभरपेक्षा अधिक वर्षे लाखो कुटुंबांचे पोट भरणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीने मायानगरीतील कलावंतांना भुरळ पाडली. देशभरातील माध्यमांनी या रंगभूमीची दखल घेतली आणि तिची ओळख दूरवर झाली. चार महिन्यांमध्ये रात्रीचा दिवस करून ही रंगभूमी शेकडो कोटींची उलाढाल करते, यावर विशेष फोकस झाला आणि वेदनांकडे दुर्लक्ष झाले. एकदा मोसम सुरू झाला की, नाटकात व्यस्त राहायचे आणि मोसम संपला की, शेतीच्या कामांमध्ये गुंतून राहायचे. या व्यस्त वेळापत्रकात स्वतःच्या समस्यांना सरकारपर्यंत नेण्यासाठी झाडीपट्टीला वेळ मिळाला नाही. ज्यांनी तसा प्रयत्न केला, त्याला सरकारने दाद दिली नाही. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांच्या दुर्गम भागांमध्ये दिवाळी ते होळी या कालावधीत होणारी झाडीपट्टीची नाटके म्हणजे महोत्सवापेक्षा कमी नव्हे; पण हे सारे विस्कळीत आहेत. राजकारण बाजूला ठेवून एकमेकांच्या अडचणींना सारे धावून जातात.

पण, सर्वांवर येणारे संकट सोडविण्यासाठी राजाश्रयाशिवाय पर्याय नाही. यावर झाडीपट्टी महामंडळाच्या स्थापनेचा पर्याय काही मंडळींनी शोधला होता. महामंडळाची स्थापना झाली, तर झाडीपट्टीतील कलावंतांचे मेळावे, झाडीपट्टी रंगभूमीचे संमेलन आदींचे आयोजन करता येईल. या माध्यमातून कलावंतांचे मानधन, वृद्ध कलावंतांच्या निवृत्तिवेतनाचे विषय लावून धरता येतील आणि शासनापर्यंत आवाज पोहोचविणेही सोपे होईल, यात वाद नाही. मुख्य म्हणजे विस्कळीत असलेली झाडीपट्टी रंगभूमी एका व्यासपीठावर येऊ शकेल.

झाडीपट्टी रंगभूमी गेल्या अनेक वर्षांपासून लोकाश्रयावर जगत आहे. राजाश्रयासाठी झाडीपट्टी महामंडळाची आवश्‍यकता आहे. तसे झाले, तर सारे कलावंत एकत्र येऊ शकतील. 
- सुनील आष्टीकर, ज्येष्ठ झाडीपट्टी कलावंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com