भावनिक ‘ब्लॅकमेलिंग’चा परिणाम होणार नाही - डॉ. रवींद्र शोभणे

भावनिक ‘ब्लॅकमेलिंग’चा परिणाम होणार नाही - डॉ. रवींद्र शोभणे

नागपूर - ‘मी माझी वाट निष्ठेने चालतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. त्यामुळे कुणाच्या भावनिक ‘ब्लॅकमेलिंग’चा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. यावर्षी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,’ या शब्दांत ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासोबतच आपल्याकडून मान ठेवण्याची अपेक्षा बाळगू नका, असे आवाहनही त्यांनी डॉ. किशोर सानप यांना केले आहे.

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. रवींद्र शोभणे यांनी पाच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरूनच आपली उमेदवारी जाहीर केली. दोनवेळा या ना त्या कारणाने पाऊल मागे घेणारे डॉ. शोभणे यांनी यंदा माघार घेणार नाही, हेही स्पष्ट केले. मात्र, डॉ. किशोर सानप यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून त्यांना यंदाही थांबण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले. त्यावर डॉ. शोभणे म्हणतात, ‘यावर्षी तू संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभा राहा, मी तुला मदत करेन. पुढच्या वर्षी मी उभा राहीन तेव्हा तू मला मदत कर’, असे फोनवर बोलणारे डॉ. सानप परस्पर आपली उमेदवारी जाहीर करून मोकळे होतात. दिलेला शब्द आपण किती पाळतो याचा त्यांनी विचार करावा आणि मग माझ्याकडून मान ठेवण्याची अपेक्षा बाळगावी.’ ‘आपले नाव पाच वर्षांपासून अध्यक्षपदासाठी चर्चेत होते, असे डॉ. सानप ठोकून देतात. मी तरी त्यांच्या नावाची चर्चा कधी ऐकली नाही. आपल्याविषयीचे असे आत्मग्लानीयुक्त शुभचिंतन करणे त्यांनाच लखलाभ असू देत. ते माझे मित्र आहेत. पण या अनुभवाने मैत्री काय असते हे कळले,’ अशी भावनाही ते व्यक्त करतात. 

‘मी गेली चाळीस वर्षे निष्ठेने लेखन आणि साहित्यविषयक उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. आजच्या लिहित्या पिढीला पुढे आणण्यासाठी मी उपक्रम राबविलेले. मी घराची दारं बंद करून, आपल्या प्रकृतीच्या कारणावरून इतरांना भावनिकदृष्ट्या ‘ब्लॅकमेल’ करून व्यावहारिक फायदे पदरात पाडून घेतले नाहीत. एक कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, संपादक आणि महाभारताचा नव्या रंगाने विचार करणारा, नव्याने त्याची मांडणी करणारा एक अभ्यासक म्हणून मी सर्व परिचित आहे. केवळ संतांच्या अभंगांचे अर्थ सांगून व्रतस्थ अभ्यासक वगैरे म्हणवून न घेता मी आर्ष महाकाव्याचा संदर्भ आधुनिक जगण्याशी लावून तो सर्जनाच्या पातळीवर मांडण्याचा प्रयत्न करणारा एक कादंबरीकार आहे,’ याकडे डॉ. शोभणे लक्ष वेधतात. दहा वर्षांपूर्वी नागपूरच्या ८० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू होते. त्यानंतर दहा वर्षांत कुणी कादंबरीकार संमेलनाचा अध्यक्ष झालेला नाही. मी प्रामुख्याने मराठी साहित्यात कादंबरीकार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यावर्षी माझी उमेदवारी अधिक सयुक्तिक आहे, असेही ते स्पष्ट करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com