गरिबांसाठी आता मेडिकल नाही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

अटेंडंट्‌सची ३२२ रिक्त पदे - ऑनलाइन कार्डसाठी मोजक्‍याच खिडक्‍या 

अटेंडंट्‌सची ३२२ रिक्त पदे - ऑनलाइन कार्डसाठी मोजक्‍याच खिडक्‍या 

नागपूर - ज्यांचे कोणी नाही, त्यांच्यावरील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आहे. येथे अतिदक्षता विभाग असो की, २५ कोटी रुपये खर्च करून तयार केलेले ट्रॉमा युनिट, येथे अटेंडट्‌स नावाचा कर्मचारी शोधूनही सापडत नाही. रुग्णाला तातडीने एक्‍स रे, सिटी स्कॅन तसेच शस्त्रक्रियागृहात पोहोचविण्यासाठी अटेंडंट हाच शिलेदार असतो. परंतु, हा शिलेदार मेडिकलमधून हद्दपार होत आहे. मेडिकलमध्ये अटेंडंटची तब्बल ३२२ पदे रिक्त आहेत. तर जे अटेंडंट काम करीत आहेत, ते वृद्धत्त्वाकडे झुकले आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांवर स्ट्रेचर ओढत नेण्याची पाळी येते. विशेष असे की, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अटेंडंट दिसत नाही. ट्रॉमा युनिटमधून रुग्णाला ओढत आणताना रस्ता ओलांडावा लागतो. भररस्त्यामध्ये वाहन येत असताना स्ट्रेचर ओढण्याचे काम नातेवाईक करतात. यामुळे धोका होण्याची भीती आहे. गरिबांसाठी मेडिकल आहे. मेडिकलमध्ये कधीकाळी ८२२ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे होती. यापैकी ५२२ पदे अटेंडंटची होती. गेल्या २० वर्षांत मेडिकलमधील अटेंडंट निवृत्त होत गेले. यातील अनेकांचा मृत्यू झाला. परंतु, रिक्त होणाऱ्या पदावर नियुक्ती करण्याचे धोरणच राज्य शासनाने आखले नाही.

यामुळे अल्प मनुष्यबळाचा फटका रुग्णालय प्रशासनाला पडत राहिला. 
दोन दशकांपूर्वी मेडिकलमध्ये २६ वॉर्ड होते. बाह्यरुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे नव्हती. तर भरती होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील मर्यादित होती. विभागही कमी होते. वॉर्ड व रुग्णसंख्या गृहित धरून ५२२ अटेंडंटची पदे मंजूर करण्यात आली होती. अलीकडे मेडिकलमध्ये ४७ वॉर्ड आहेत.

खाटांची संख्या २,००० वर पोहोचली आहे. दर दिवसाला नवीन विभाग तयार होत आहे. निवासी डॉक्‍टरांच्या संख्येत वाढ होत आहे. परिचारिकांच्या संख्येत वाढ होत आहे. ६९२ परिचारिका होत्या. अलीकडे १,००० परिचारिका मेडिकलमध्ये काम करीत आहेत. गरज नसताना परिचारिकांची गर्दी वाढवली आहे. परंतु, अटेंडंटच्या पदात वाढ करण्यात आली नाही. शिवाय जुनी रिक्त पदेही भरली जात नसल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे. मेडिकलमध्ये अटेंडंटची केवळ १९० पदे भरली असून ३२२ पदे रिक्त असल्याची माहिती उजेडात आली आहे. 

तत्काळ उपचारात ऑनलाइनचा खोडा  
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हॉस्पिटल मॅनेजमेंट इंफॉर्मेशन सिस्टिमअंतर्गत ऑनलाइन करण्यात आले. बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती एका ‘क्‍लिक’वर उपलब्ध होते. परंतु, मेडिकलमध्ये या सिस्टिममुळे रुग्णांना उपचारासाठी बराच उशीर होतो. कार्ड नोंदणी करताना रुग्णांची प्रचंड गर्दी असते. कार्ड काढण्यासाठी गर्दी झाल्यामुळे रुग्णांवर लवकर उपचार होत नाही. जोपर्यंत कार्ड निघत नाही, तोपर्यंत उपचार होत नाही. 

गर्दीचा फटका गंभीर रुग्णाला
गर्दीमुळे कार्ड काढण्यासाठी तासभर उभे राहावे लागते. यानंतर डॉक्‍टरांकडे तासभर उभे राहावे लागते. गंभीर रुग्णालादेखील याचा फटका बसतो. रुग्ण येताच त्याच्या हाती कार्ड मिळावे अशी सिस्टिम येथे असणे आवश्‍यक आहे. कार्ड लवकर मिळाले तरच उपचार लवकर होतील. परंतु, एचएमआयएसला कंत्राट मिळाल्यानंतर पूर्वी सर्वच खिडक्‍यांवर नोंदणी होत असे. पुढे हळूहळू कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत गेली आणि आता मोजक्‍याच खिडक्‍या सुरू ठेवण्यात येतात. यामुळे आपोआपच गर्दी होते.

२४ तास सेवेत असावेत अटेंडंट
४७ वॉर्डांत, ७ शस्त्रक्रियागारात, बाह्यरुग्ण विभाग, २ आकस्मिक विभाग, लहान मुलांचे तसेच ज्येष्ठांचे अतिदक्षता विभागात तसेच ट्रॉमा युनिटमध्ये २४ तास अटेंडंट ठेवणे रुग्णालयाची गरज आहे. परंतु, ही गरज पूर्ण होत नसल्यामुळेच रुग्णसेवा देणारे हातही हतबल झाले आहेत. 

Web Title: nagpur vidarbha news no medical for poor