ओएई चाचणी व्हावी सक्तीची

ओएई चाचणी व्हावी सक्तीची

नागपूर - राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय असो, की जिल्हा रुग्णालयात "ओएई' चाचणीची सोय आहे; परंतु ही चाचणी करण्याकडे सरकारी रुग्णालयांचा कलच दिसत नाही.

रुग्णालयांच्या उदासीनतेमुळे आणि बालपणातच कर्णबधिरता लक्षात न आल्याने राज्यात कर्णबधिरांची संख्या वाढत आहे.

राज्यात अपंग प्रवर्गात सात प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश आहे. संख्याबळाच्या निकषावर पहिल्या स्थानावर "दृष्टिहीन', दुसऱ्या "अस्थिव्यंग' आणि तिसऱ्या स्थानावर "कर्णबधिरां'चा क्रमांक आहे. राज्यात एकूण अपंग 30 लाखांच्या घरात आहे. यातील 5 लाख 71 हजारांवर कर्णबधिर आहेत. जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये कर्णदोष निदानासाठी "ओएई' चाचणीच्या वापरातून बालक कर्णबधिर आहे किंवा नाही, याची सहज तपासणी करता येते. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात या चाचणीची मशिन असूनही ती करण्यासाठी डॉक्‍टर पुढे येत नाहीत.

जन्मल्यानंतर दोन अडीच वर्षांत मुलाला ऐकू येत नाही, ही बाब समजल्यानंतर पालकांकडून धावपळ सुरू होते. कर्णदोष उशिराने लक्षात आल्यानंतर बरे होत नाहीत. किंबहुना बालकासह कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतो. कर्णदोष दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम राबवला जातो; परंतु तपासणीस आलेल्या मुलांचे वय दोन-अडीच असते. अडीच वर्षांनंतर कर्णदोष समोर आल्यावर कॉक्‍लिअर इम्प्लांटशिवाय पर्याय नसतो. कर्णदोषाचे "कंडक्‍टिव्ह हेअरिंग लॉस', "मिक्‍सड्‌ हेअरिंग लॉस' आणि "सेन्सरी न्यूरल' असे तीन प्रकार आहेत. पहिला व दुसऱ्या प्रकारातील आजार वेळेत लक्षात आल्यास बरे होतात आणि अशा मुलांना भविष्यातील त्रासापासून वाचवता येते.

उपजिल्हा रुग्णालये "ओएई' यंत्राशिवाय
निवडक जिल्हा रुग्णालयात "ओएई' चाचणीची सोय आहे; परंतु उपजिल्हा रुग्णालयात ही सोय नाही. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात 20 टक्के प्रसूती होतात. प्रसूतीची सोय उत्तम परंतु अशा रुग्णालयात "ओएई' यंत्रे नाहीत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत ही चाचणी उपलब्ध आहे; परंतु रुग्णालयाच्या प्रसूती विभागात जन्मास येणाऱ्या प्रत्येक नवजात अर्भकाची "ओएई' मशीनद्वारे श्रवण क्षमतेची तपासणी होत नाही. ती सक्तीची केल्यास कर्णदोष वेळेत लक्षात आल्याने मुलांवर तत्काळ उपचार होऊन ती सामान्य जीवन जगू शकतील, त्यासाठी सरकारने "ओएई' चाचणी सक्‍तीची करावी, असे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अभिजित राऊत यांनी सांगितले.

आकडे बोलतात
-राज्यात एकूण कर्णबधिर - पुरुष कर्णबधिर - महिला कर्णबधिर
-5 लाख 71 हजार 7 - 2 लाख 67 हजार 75 -2 लाख 39 हजार 934

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com