‘हॅपी बर्थ डे आलिया’ म्हणत चारला विषयुक्त केक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

दुसऱ्या पत्नीला वाढदिवशीच जिवे मारण्याचा प्रयत्न
नागपूर - विवाहित असूनही जमील खानने आलियासोबत प्रेमविवाह केला. अवघे चार महिने उलटले असताना नवा ‘निकाह’ पहिल्या संसारात अडसर ठरत असल्याचा साक्षात्कार त्याला होऊ लागला... आणि त्याने आलियाच्या वाढदिवसालाच खुनशी डाव रचला. ‘हॅपी बर्थ डे आलिया’ म्हणत विष मिसळलेला केक तिला चारला. आलिया आता मृत्यूशी झुंज देत आहे. 

दुसऱ्या पत्नीला वाढदिवशीच जिवे मारण्याचा प्रयत्न
नागपूर - विवाहित असूनही जमील खानने आलियासोबत प्रेमविवाह केला. अवघे चार महिने उलटले असताना नवा ‘निकाह’ पहिल्या संसारात अडसर ठरत असल्याचा साक्षात्कार त्याला होऊ लागला... आणि त्याने आलियाच्या वाढदिवसालाच खुनशी डाव रचला. ‘हॅपी बर्थ डे आलिया’ म्हणत विष मिसळलेला केक तिला चारला. आलिया आता मृत्यूशी झुंज देत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमील खान (वय ३५, रा. फारूख नगर, नवी वस्ती, टेका) याचा पाचपावली येथे कपड्यांचा कारखाना आहे. त्याला पत्नी व तीन मुले आहेत. मोठ्या कंपन्यांकडून कपडे शिवण्याचे कंत्राट तो घेतो. शिवणकाम करण्यासाठी त्याच्या कारखान्यात महिला कामाला आहेत. आलियाही (वय २५, रा. पिवळी नदी, एकतानगर) त्याच्याकडेच शिवणकाम करायची. तिच्या सौंदर्यावर जमील भाळला. तिच्याशी जवळीक करू लागला.

आलियाच्या वडिलांचे निधन झालेले. दोन बहिणींचा विवाह झाला. आई सायरा बानो अहमद खानसोबतच ती राहायची. आलियाला त्याने पुढे शिवणकाम न करू देता कारखान्यातील मजुरांवर देखरेखीचे आणि इतर व्यवस्थापनाचे काम दिले. कामाचे वेगवेगळे बहाणे करून तिला तो बाहेरही घेऊन जात असे. आपण निकाह लावू, आदी आश्‍वासनही दिले. त्यांच्यात शारीरिक जवळीकही निर्माण झाली. पुढे आलियाने लग्नाचा तगादा लावला. तो विवाहित असल्याचेही तिला कळले. मात्र, त्याने आलियाच्या आईशी चर्चा करून लग्नाची तयारी दर्शविली. त्याच्या पहिल्या पत्नीसह सर्वांना यासाठी त्याने तयार केले. ११ मार्च २०१७ मध्ये घराशेजारच्या मशिदीत त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ते दोघेही बाहेरगावी फिरायला गेले. आलियाच्या आईचे घर स्वतःच्या नावे करण्यासाठी तो दबाव टाकत होता. मात्र, त्यासाठी आलिया नकार देत होती. त्यावरून दोघांत वाद सुरू होता... आणि त्याने आलियाला संपविण्याचा कट रचला. 

 ‘मी केक आणतो, आपण सेलिब्रेट करू’
जमीलने आठ दिवसांपूर्वी आलियाला आईकडे सोडून दिले. आलियाचा २२ जुलैला वाढदिवस होता. ‘मी केक आणतो, आपण सेलिब्रेट करू’, असे फोन करून जमीलने तिला सांगितले. २१ जुलैला रात्री पावणेबारा वाजता तो पोहोचला. त्याने केकमध्ये आधीच विष कालवून आणले होते. रात्री बाराच्या ठोक्‍याला दोघांनीही केक कापला. जमीलने तिला विषारी केक भरविला.

स्वतः पान खाऊन आल्यामुळे केक खाण्यास नकार दिला. त्यानंतर लगेच तो तेथून निघून गेला. थोड्याच वेळात आलियाच्या तोंडातून फेस यायला लागला. तिच्या आईने गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या जावयाला फोन केला. त्यांनी मेयोत उपचारासाठी दाखल केले. आलियावर उपचार सुरू आहेत. 

आलिया ठरत होती काटा
विवाहित असलेल्या जमील खानने पत्नी असतानासुद्धा लग्न केले. त्यामुळे पहिल्या पत्नीसोबत वाद होत होता. त्यानंतर आलिया आणि त्याच्या पत्नीतही पतीच्या हक्‍कावरून पटत नव्हते. त्यामुळे आलिया ही वैवाहिक जीवनात काटा ठरत होती. त्यामुळे आलियाच्या आईचे घर हडपून आलियाचा काटा काढण्याची योजना जमीलने आखली होती, अशी माहिती यशोधरानगर पोलिसांनी दिली.

Web Title: nagpur vidarbha news poison in cake