शाळेत असताना गणितात होते ‘फ्लॉप’ - प्रीती जिंटा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - एकेकाळी एकाहून एक ‘सुपरहीट’ चित्रपट देणारी बॉलीवूडची नायिका प्रीती जिंटाने शाळेत असताना आपण ‘फ्लॉप’ होतो, अशी स्पष्ट कबुली दिली. एकलव्य एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा रविवारी पार पडला. यावेळी प्रीती जिंटाची उपस्थिती विशेष आकर्षण ठरले.

नागपूर - एकेकाळी एकाहून एक ‘सुपरहीट’ चित्रपट देणारी बॉलीवूडची नायिका प्रीती जिंटाने शाळेत असताना आपण ‘फ्लॉप’ होतो, अशी स्पष्ट कबुली दिली. एकलव्य एकल विद्यालयाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा रविवारी पार पडला. यावेळी प्रीती जिंटाची उपस्थिती विशेष आकर्षण ठरले.

(कै.) लक्ष्मणराव मानर स्मृती संस्थेतर्फे रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, संस्थेचे अध्यक्ष अरुण लखानी, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

देशाच्या कानाकोपऱ्यांतील चित्रपट रसिकांना गालावरच्या खळीने भुरळ पाडणारी प्रीती रविवारी भाषण द्यायला उठली तेव्हा तिने अभिवादन करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. विदर्भाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले एकल विद्यालयाचे ५०४ शिक्षक आणि ६४ पर्यवेक्षक आपापल्यापरीने जमेल तसे प्रीती जिंटाची छायाचित्रे आणि व्हिडियो मोबाईलमध्ये टिपत होते.
ती म्हणाली, ‘मला गणित जमायचे नाही म्हणून गणिताच्या शिक्षिकाही आवडायच्या नाहीत. परंतु, आज इथे एवढे सर्व शिक्षक बघून भारावले आहे. इथल्या प्रशिक्षण वर्गात चार दिवसांत तुम्ही लोक किती शिकले मला माहिती नाही. मात्र, मी तुमच्याकडून एका दिवसात बरेच काही शिकले.’ महिलांना स्वतःच्या रक्षणाचे धडे देताना पुरुषांना महिलांच्या रक्षणाचे धडे देण्याचीही गरज आहे. हे शिक्षण शालेय जीवनापासूनच द्यायला हवे, असेही ती म्हणाली.

नितीन गडकरी म्हणाले, ‘गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांमध्ये औषध आहे, तर डॉक्‍टर नाही. डॉक्‍टर आहे, तर औषध नाही. या दोन्ही गोष्टी असतील, तर उपचार घ्यावा असे दवाखाने नाही. त्यामुळेच ज्या ठिकाणी अंधार आहे, तिथेच प्रकाशाची किरणे पोहोचविण्याचे काम एकल विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे.’

गडकरी वाड्यावर ‘डिनर’
एकल विद्यालयाचा कार्यक्रम आटोपल्यावर प्रीती जिंटासाठी गडकरी वाड्यावर खास ‘डिनर’चे आयोजन होते. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांच्या निमंत्रणावरूनच ती नागपुरात आली. आपण आजपर्यंत ‘गडकरी-रोडकरी’ एवढेच समजत होतो. मात्र, इथे आल्यावर ‘गडकरी-शिक्षणकरी’देखील आहेत, याचा साक्षात्कार झाला, असे प्रीती म्हणाली.

‘झिंटा नहीं जिंटा’
नितीन गडकरी यांनी भाषणात प्रीती झिंटा असा उल्लेख करताच प्रीती हसली आणि ‘झिंटा नहीं जिंटा’ असे म्हणायची विनंती केली. त्यावर गडकरींनीदेखील ‘त्यांचे नाव प्रीती जिंटा असे आहे’ असे सभागृहाला सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news preity zinta talking