मनोरुग्णालयातील वीज खंडित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नागपूर - गळा आवळून होणारे मनोरुग्णांचे खून, मनोरुग्णांसाठी गरम पाण्याची नसलेली सोय अशा घटनांनी प्रादेशिक मनोरुग्णालय नेहमीच चर्चेत राहाते. मात्र, रविवारी १ एप्रिल रोजी सकाळपासून मनोरुग्णालयातील वीज खंडित झाली. यामुळे मनोरुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला.

नागपूर - गळा आवळून होणारे मनोरुग्णांचे खून, मनोरुग्णांसाठी गरम पाण्याची नसलेली सोय अशा घटनांनी प्रादेशिक मनोरुग्णालय नेहमीच चर्चेत राहाते. मात्र, रविवारी १ एप्रिल रोजी सकाळपासून मनोरुग्णालयातील वीज खंडित झाली. यामुळे मनोरुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला.

विशेष असे की, वीज खंडित असल्यामुळे टाकीत पाणी भरता आले नाही. दिवसभर पाण्यासाठी मनोरुग्णांचा टाहो सुरू होता. परंतु, रविवार असल्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेणारा एकही अधिकारी येथे उपस्थित नसल्याची माहिती पुढे आली. विशेष असे की, उकाड्यामुळे संतप्त झालेल्या मनोरुग्णांना सांभाळणे कठीण होऊन बसले होते. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या हलगर्जीपणामुळे गेल्‍या दोन दिवसांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे.

शनिवारी सकाळपासूनच वीज खंडित होती.  परंतु, रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे येथील विद्युत यंत्रणा सांभाळणारा एकही कर्मचारी येथे उपस्थित नव्हता. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून वारंवार फोन करण्यात आला. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. 

मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना रविवारी अंघोळीशिवाय काढावा लागला. विद्युत नसल्यामुळे येथील टाकीत पाणी सोडता आले नाही. टाकी रिकामी असल्यामुळे मनोरुग्णांच्या एकाही वॉर्डात पाणी पोहोचवता आले नाही. पिण्यासाठी मनोरुग्णांसह कमचाऱ्यांनाही पाणी मिळाले नाही. कर्मचाऱ्यांनी चौकातील टपरीवर जाऊन तहान भागवली. 

मात्र, मनोरुग्णांना तर पाण्याशिवाय राहावे लागले. प्रशासनाला यासंदर्भात कळविण्यात आले. मात्र, सायंकाळी साडेसहापर्यंत कोणीही संपर्क साधला नसल्याचे सूत्रांनी कळविले.

मनोरुग्ण असल्याने कर्मचारी - सहारे
मनोरुग्ण येथे भरती असल्यामुळे सारे कर्मचारी आहेत. विद्युत यंत्रणा सांभाळण्यापासून तर चतुर्थश्रेणी कर्मचारी, डॉक्‍टर, परिचारिका आणि सारेच कर्मचारी नित्यनियमाने दरमहा वेतन घेतात. मात्र, मनोरुग्णांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही, अशी खंत विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी व्यक्त केली.

Web Title: nagpur vidarbha news Psychiatric hospital electricity close