विरोधकांनो, नौटंकी बंद करा - राधामोहन सिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नागपूर - आज शेतकरीहिताच्या गोष्टी करणारे कधीकाळी सत्तेत होते तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. त्यांच्याच काळात देश कृषी क्षेत्रात माघारला; पण आज तेच संसदेत कृषी व सिंचनात माघारल्याची कारणे विचारतात, तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विरोधकांनी नौटंकी करणे बंद करावे, अशी टीका केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केली.

"नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड'च्या "मदर डेअरी' प्रकल्पाचे लोकार्पण आज (ता. 4) त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदी उपस्थित होते. राधामोहन सिंग म्हणाले, शेतकरी नेते म्हणून सुरू असलेली दुकानदारी बंद होण्याच्या भीतीने राज्यात असेच लोक षडयंत्र रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकरीहिताची जी कामे सत्तेत अनेक वर्षे राहूनही विरोधकांना करता आली नाहीत तेवढी कामे मोदी सरकारने तीन वर्षांत केली आहेत. मागच्या सरकारमध्ये कृषी धोरण ठरविताना दीडपट उत्पन्नाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. आज तेच लोक स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ओरडत आहेत.

Web Title: nagpur vidarbha news radhamohan sing talking