रेल्वेस्थानक होणार घाणीपासून मुक्त

रेल्वेस्थानक होणार घाणीपासून मुक्त

नागपूर - देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वेस्टेशनच्या ‘वर्ल्डक्‍लास’ दर्जाने विकासाच्या बाता होत असल्या तरी पार्किंगमध्ये मात्र घाणीची बजबजपुरी दिसून येते. प्रवाशांना नाक दाबून कचऱ्याचे ढिगारे ओलांडल्यानंतरच दुचाकी पार्क करावी लागते. आता मात्र डम्पिंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आली असून या समस्येतून कायमची मुक्ती मिळण्याची शक्‍यता बळावली आहे.

अपुऱ्या जागेमुळे नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडील भागात पार्किंगची मोठी समस्या आहे. रामझुल्याखाली वाहनतळ हलवून या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तळापर्यंत वाहन नेण्यासाठी दुचाकीचालकांना मोठ्या दिव्यातून जावे लागते. एकावेळी एकच गाडी जाऊ किंवा येऊ शकेल एवढ्या चिंचोळ्या गल्लीतून तळापर्यंत पोहोचता येते. रामझुल्याखालीच टाकाऊ खाद्यपदार्थासह कचरा फेकून दिला जातो. परिणामी दुर्गंधीमुळे श्‍वास घेणेही कठीण आहे. वाहनचालकांना नाक दाबून हा अडथळा पार करावा लागतो. 

नागपूर स्थानकावरून ‘अपडाउन’ करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. त्यांना वाहन पार्किंगमध्ये ठेवण्यावाचून पर्याय नाही. चाकरमान्यांकडून या प्रकाराबाबत वारंवार तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कुणीच दखलच घेत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने संत्रामार्केटकडील पडीत जागेत कचरा टाकण्यासाठी जागा निश्‍चित केली आहे. यापुढे याच जागेवर कचरा टाकण्याची सक्ती करण्यात येणार आहे. अन्यत्र कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com