नागपूर जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे थैमान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नागपूर - जिल्ह्यात सोमवारी (ता. 5) दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळवारा व पावसाने थैमान घातले. मौदा तालुक्‍यातील अरोली येथे गारपीट, तर कोराड येथे वीज पडून तीन जनावरे ठार झाल्याची घटना घडली. काटोल व कोंढाळी येथे वादळ व पावसाचा संत्रा, मोसंबी आदी पिकांना जोरदार तडाखा बसला. वादळवाऱ्याने विजेचे खांब वाकल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोंढाळी येथे वादळासह गारपीट व पावसाने सकाळी दहा वाजता जोरदार हजेरी लावली. वादळामुळे परिसरातील अनेक घरांवरील छत उडाल्याने मोठे नुकसान झाले. बाजार चौकातील रोडवरील झाडे व पोलिस ठाण्याच्या परिसरातील उंच टॉवर कोसळला. बाजूलाच पोलिस वसाहत असून सुदैवाने कुठलीही हानी मात्र झाली नाही. काही ठिकाणी विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होता. तसेच भुतडा शाळेच्या इमारतीवरील लाकूडफाट्यासहित टिना उडाल्या. बसस्थानकावरील चहाची दुकाने, पानटपरीवरील छते उडाली.

परिसरातील दुधाळा, रामनगर, नांदोर खुरसापर येथेसुद्धा मोठे नुकसान झाले. घराच्या भिंती कोसळल्या. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप आले होते. बाजार रोडवरील झाडे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. परिसरात वादळासह गारपीट झाली. वादळाचा जोर सुमारे एक तास कायम होता. त्यामुळे गावामधील टिनाचे छत उडाले. संत्रा, मोसंबी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. संत्रा उत्पादक संकटात सापडला आहे. परिणामी वादळामुळे झालेल्या नुकसान स्थळाला कोंढाळीचे सरपंच वैशाली गोपाल माकोडे, उपसरपंच गुड्डू काळबांडे, पं. स. सदस्य रामदास मरकाम, पं. स. उपसभापती योगेश चापले, प्राचार्य दा. सी. कुहिटे यांनी भेट दिली.

Web Title: nagpur vidarbha news rain