वारंवार प्रयत्न करणाऱ्यांपैकी मी नाही - रवींद्र गुर्जर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाने बिनविरोध निवडीची अपेक्षा बाळगणे मुळीच चुकीचे नाही. मात्र, निवडणूकच होऊ नये, हेही योग्य नाही.
- रवींद्र गुर्जर ज्येष्ठ अनुवादक

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. हाच माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न असेल; कारण वारंवार प्रयत्न करणाऱ्यांपैकी मी मुळीच नाही, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे आणि राजन खान यांच्यासह रवींद्र गुर्जर यांनीदेखील सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमांद्वारे आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. ते म्हणाले की, स्थळ जाहीर झाल्यावर निवडणुकीची समीकरणे बदलतील. आणखी काही नावे पुढे येण्याचीही शक्‍यता आहे. सातत्याने ज्या ज्येष्ठ व्यक्तींच्या नावांची चर्चा सुरू आहे, त्यांनी तयारी केलीच, तर त्यांचा प्रभावही असेल. मात्र, असे काही होण्यापूर्वीच माघार घेण्याची चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. तूर्तास मी निवडणुकीसाठी तयारी केली आहे. मतदारांशी संपर्कही साधत आहे. गेली ४२ वर्षे साहित्य क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून सातत्याने काम सुरू असल्याचे ते सांगतात. पत्रकारिता, लेखन, ग्रंथालय चळवळ या क्षेत्रांमध्ये मी सातत्याने काम करतोय. माझ्या ‘पॅपिलॉन’ या अनुवादित कादंबरीने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळविली. याव्यतिरिक्त प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आजवर १०० पुस्तके प्रकाशित झालीत, असे ते म्हणाले. मुख्य म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपल्या रूपाने प्रथमच एक अनुवादक अध्यक्ष म्हणून लाभू शकेल, असा विश्‍वास ते व्यक्त करतात.

Web Title: nagpur vidarbha news ravindra gurjar talking