माझ्यासाठी सगळीकडे अनुकूल वातावरण - रवींद्र गुर्जर

माझ्यासाठी सगळीकडे अनुकूल वातावरण - रवींद्र गुर्जर

नागपूर - मुंबई-पुण्यातून माझ्या मतांवर कुठलाही परिणाम होणार नाही. शिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातूनही मला काही प्रमाणात आशा आहे.

त्यामुळे एकूणच निवडणुकीत माझ्यासाठी अनुकूल वातावरण आहे, असा विश्‍वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार रवींद्र गुर्जर यांनी आज (गुरुवार) येथे व्यक्त केला.

यंदा संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन खान आणि रवींद्र गुर्जर हे दोन उमेदवार पुण्याचे,  तर डॉ. किशोर सानप आणि डॉ. रवींद्र शोभणे हे दोन उमेदवार विदर्भाचे आहे. तर, लक्ष्मीकांत देशमुख मूळचे मराठवाड्याचे. डॉ. शोभणे, डॉ. सानप आणि लक्ष्मीकांत देशमुख यांनी मनोहर म्हैसाळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आशीर्वाद घेतलेला आहे. राजन खान यांचे विमान अद्याप नागपुरात लॅंड व्हायचे आहे. तर, रवींद्र गुर्जर यांनी आज म्हैसाळकर यांच्या भेटीचा योग साधला. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘विदर्भातील दोन उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतदारांमध्ये विभागणी शक्‍य आहे. मात्र, तरीही माझ्या वाट्याला मते येतील याचा विश्‍वास आहे.

मराठवाड्यातूनही मला मते मिळतील. मुंबई आणि पुण्यात मात्र कुठल्याच उमेदवाराचा माझ्या मतांवर परिणाम होणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्या तीनमध्येच माझा क्रमांक असेल.’ अध्यक्ष झाल्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘अनेक गोष्टी मी आजही करतोय. मात्र, अध्यक्षपदावरून त्या व्यापक होतील आणि माझ्या आवाहनाला प्रतिसादही मिळेल. पाचशे अनुवादक तयार करण्याचा माझा संकल्प आहे. सध्या कथा-कादंबरी मागे पडल्यामुळे अनुवादाची नितांत गरज निर्माण झाली आहे. याच अनुवादाने मला नागपूरपर्यंतही पोहोचविले असल्याने मतेही मिळतील.’ 

‘म्हैसाळकर प्रेमाने बोलले’
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांची भेट सकारात्मक झाली का, या प्रश्‍नावर मिष्कील हास्य देत ‘म्हैसाळकर माझ्याशी अतिशय प्रेमाने बोलले’ असे रवींद्र गुर्जर यांनी सांगितले. विदर्भातून त्यांना फारशी अपेक्षा नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com