डोके फुटल्यावर जाग येणार काय?

डोके फुटल्यावर जाग येणार काय?

चौकातील हौदांवर नागरिक संतप्त - ‘सोशल मीडिया’वर काढले महानगरपालिकेचे वाभाडे

नागपूर - फक्त सिमेंट रोड केले जात आहेत. सदोष बांधकामाकडे कुणाचेही लक्ष नाही. चारही बाजूंनी उंच सिमेंट रस्त्यांवरून चौकात उतरताना व चढताना दुचाकीमागील कुटुंब सिमेंट रोडवर पडल्यास डोके फुटल्याशिवाय पर्याय नाही. नागरिकांची डोके फुटल्यावर महापालिकेला जाग येणार काय? असा संतप्त सवाल नागपूरकर नागरिकांनी उपस्थित केला. 

‘चौकाचे झाले हौद’ मथळ्याखाली ‘सकाळ’ने आज ठळकपणे सिमेंट रस्त्यांवरील चौकांची दुर्दशा मांडली. शहरात तयार झालेले सिमेंट रस्ते केवळ चौकांपर्यंत किंवा चौकांपासून पुढे तयार केले आहेत. सिमेंट रस्ते उंच झाल्याने चौकांमध्ये मोठा गोल खड्डा तयार झाला असून, पावसाळ्यात येथे हौदाचेच चित्र दिसून येते. रेशीमबाग चौक, जगनाडे चौक, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी चौक, लक्ष्मीनगर चौक, गजानन चौक, खामला चौकासह अनेक नव्या रस्त्यांतील चौकांतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसोबतच वृद्ध आणि गर्भवती महिलांनाही दचक्‍यांचा त्रास होत असल्याकडे या वृत्तांतून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. महापालिकेच्या या बेजबाबदारीवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्रामवर या वृत्तामुळे महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. नंदनवन येथून एस. टी. बसस्थानकापर्यंत दररोज ग्रेट नाग रोडने प्रवास करणाऱ्या एका नागरिकाने तर जगनाडे  चौकातून प्रवास करताना दोनदा दचके सहन करावे लागत असल्याचे नमूद केले. चौकातून सिमेंट रस्त्यांवर चढताना एखादवेळी कुणी आडवा आल्यास दुचाकीस्वाराला ब्रेक मारण्याशिवाय पर्याय नाही, अशावेळी त्याचे खाली पडणे निश्‍चित आहे. दुचाकीचालकाकडे हेल्मेट असते, परंतु  मागील बसणाऱ्याकडे हेल्मेट नसल्याने सिमेंट रोडवर त्याचे डोकेच फुटेल, असेही त्याने संतापजनक प्रतिक्रियेत नमूद केले. महापालिकेने सिमेंट रस्ते तयार करताना निदान चौकात तरी असे मोठे खड्डे तयार करू नये, अशी अपेक्षा व्हीआयपी रस्त्याने सिव्हिल लाइन्सला दररोज जाणाऱ्या एका चाकरमान्याने व्यक्त केली.

मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांना असुविधा होत आहे. हिंगणा रोड तर मनस्तापाचा रोड झाला. सिमेंट रस्ते तयार करताना पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही. विकासकामे करताना नागरिकांच्या सुविधांचेही भान प्रशासनाने ठेवावे.  
- वर्षा किडे कुळकर्णी, हिंगणा रोड  

चौकातून सिमेंट रस्त्यावर वाहन चढविताना अचानक कुणी आडवे आल्यास हेल्मेटमुळे वाहनचालकाचा बचाव होईल. परंतु, मागे बसणाऱ्या कुटुंबीयाचे दगडासारख्या टनक सिमेंट रस्त्यांवर डोकेच फुटेल. हा अपघात एखाद्याचे आयुष्यही उद्‌ध्वस्त करू शकतो. 
- नरेश येळणे, नंदनवन

व्हीआयपी मार्गाने सिव्हिल लाइन्सला जाताना ट्रॅफिक पार्कजवळ दोन्ही बाजूंनी सिमेंट रस्ते चौकापर्यंत आहेत. चौकातून सिमेंट रस्त्यावर कार चढविताना मागील सिटवर बसलेल्यांना दचके सहन करावे लागतात. वृद्ध आईवडील मागील सीटवर असल्यास त्यांना मणक्‍याचा त्रास  जाणवतो. 
- प्रवीण जवणे, सुरेंद्रनगर 

स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच महापालिका अधिकारी, पदाधिकारी लीन आहेत. नागरिकांकडे कोण लक्ष देतोय. 
- अमोल सेलोटकर, शांतीनगर 

सिमेंट रस्ते हवे तर नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यायला हवे. परंतु, अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट सोडली आहेत. अर्धवट रस्त्यांची कामे नागरिकांसाठी डोकेदुखीच नव्हे  तर अपघाताचे स्थळही ठरत आहे. 
- संतोष खोब्रागडे, रामेश्‍वरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com