रोहिंग्यांना आश्रय देशासाठी धोका - भागवत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नागपूर - म्यानमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी कार्यक्रमात शनिवारी दिला.

नागपूर - म्यानमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी कार्यक्रमात शनिवारी दिला.

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.

सरसंघचालकांनी एक तास 10 मिनिटांच्या भाषणात देशाची आर्थिक धोरण, कृषी धोरण व आंतरिक सुरक्षा, काश्‍मीर मुद्दा, गोरक्षा आदी विषयांवर सविस्तर विवेचन केले. भाषणाच्या सुरवातीला डॉ. भागवत यांनी मुंबईत शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या. डॉ. भागवत यांनी म्यानमारमधील दहशतवादी रोहिंग्यांना आश्रय देण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. रोहिंग्यांना म्यानमारमधून का हाकलले, याची समीक्षा आधी व्हायला हवी. रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे सामाजिक सलोखा धोक्‍यात येईल.

बांगलादेशमधून घुसखोरी सुरूच आहे. त्यांना आवरणे कठीण झाले आहे. हा धोका लक्षात घेऊनच रोहिंग्यांना वेळीच सरकारने आवर घालावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

"गोरक्षेच्या नावावर हिंसा खपवून घेऊ नये. अनेक मुसलमानही गोरक्षेचे काम करीत आहेत. गोरक्षा करणारे हिंसा करू शकत नाही. यासाठी कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले,' असे भागवत म्हणाले.

अडवानींचा मौन राग
संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी जवळपास बारा वर्षांनी हजेरी लावली. मात्र, त्यांनी मौन बाळगणेच श्रेयस्कर मानले. अडवानींच्या या मौनाचा अर्थ काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून अडवानी व संघ नेत्यांशी फारसा संवाद नव्हता, असा आरोप केला जात असताना अचानकपणे अडवानी यांनी रेशीमबाग मैदानावर हजेरी लावून राजकीय चर्चेला सुरवात केल्याचे बोलले जात आहे. मोहंमद अली जिना प्रकरणापासून संघ अडवानींवर नाराज असल्याचे बोलले जात होते. या भेटीतून ही नाराजीही दूर झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: nagpur vidarbha news Rohingya threatens shelter country