संमेलनाध्यक्षपदाची लढत होणार चौरंगी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किशोर सानप, राजन खान, रवींद्र शोभणे आणि रवींद्र गुर्जर या चार उमेदवारांची नावे निश्‍चित आहेत. त्यामुळे सध्यातरी निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. उद्यापासून (गुरुवार) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, एखादे नवीन नावही पुढे येण्याची शक्‍यता आहे.

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किशोर सानप, राजन खान, रवींद्र शोभणे आणि रवींद्र गुर्जर या चार उमेदवारांची नावे निश्‍चित आहेत. त्यामुळे सध्यातरी निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. उद्यापासून (गुरुवार) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, एखादे नवीन नावही पुढे येण्याची शक्‍यता आहे.

संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज 14 ऑक्‍टोबरपर्यंत स्वीकारले जातील आणि 23 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. बिनविरोध निवड झाली तरच पुढे येईन, असे न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्पष्ट केले होते. याशिवाय कथाकार राजन खान यांनीही "चपळगावकर अध्यक्ष होणार असतील तर माघार घेईन' असे म्हटले होते. पण, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप आणि ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने न्या. चपळगावकर यांचे नाव चर्चेतून मागे पडले आणि राजन खान यांच्याही उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. डॉ. रवींद्र शोभणे शुक्रवारी (ता. 6) विदर्भ साहित्य संघातून आपला अर्ज सादर करतील. राजन खान आणि रवींद्र गुर्जर पुढील तीन दिवसांमध्ये पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. डॉ. किशोर सानप मात्र चार पावले पुढे आहेत. त्यांनी बडोद्याच्या यजमान संस्थेकडे अर्ज दिलेला आहे. के. ज. पुरोहित यांची सूचक म्हणून स्वाक्षरी असलेला अर्ज उद्या (ता. 5) मुंबईतून दाखल होईल. त्यानंतर डॉ. गंगाधर पानतावणे यांची सूचक म्हणून स्वाक्षरी असलेला अर्ज मराठवाड्यातून, सदानंद मोरे यांची स्वाक्षरी असलेला अर्ज पुण्यातून आणि प्रा. वसंत आबाजी डहाके यांची स्वाक्षरी असलेला अर्ज नागपुरातून सादर होईल, असे त्यांनी सांगितले.

लक्ष्मीकांत देशमुखही रिंगणात?
सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याचे कळते. पण, निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही, याबाबत केवळ विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते मूळचे नांदेडचे असून, 36 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते, हे विशेष.

Web Title: nagpur vidarbha news sahitya sammelan chairman election