विदर्भातील शाळांत 'सकाळ ग्रीन डे'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नागपूर - 'सकाळ' माध्यम समूहातर्फे वसुंधरेच्या संवर्धनासाठी बुधवारी (ता. 5) "ग्रीन डे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जीवसृष्टी वाचवायची असेल, तर प्रत्येकाला पर्यावरणाचे रक्षण करावे लागेल.

नागपूर - 'सकाळ' माध्यम समूहातर्फे वसुंधरेच्या संवर्धनासाठी बुधवारी (ता. 5) "ग्रीन डे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जीवसृष्टी वाचवायची असेल, तर प्रत्येकाला पर्यावरणाचे रक्षण करावे लागेल.

नुसते रक्षण नव्हे, तर स्वत: रोपटी लावावी लागतील, हाच संदेश नागरिकांमध्ये पोचविण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी लोकांमध्ये जनजागृती करून वृक्षारोपणाचे आवाहन या उपक्रमाद्वारे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विदर्भातील शेकडो शाळांच्या परिसरात हजारांवर विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

नागपूर शहरासह जिल्ह्यातही "ग्रीन डे' उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. यात अनेक शाळांनी हिरिरीने सहभाग नोंदवून विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या माध्यमातून "झाडे लावा झाडे जगवा' हा संदेश दिला. या वेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

अमरावती शहरात अनेक शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच काही ठिकाणी शाळा व्यवस्थापनातील सदस्यांनीसुद्धा सकाळच्या या अभियानात सहभागी होत झाडे लावली. वर्धा जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये "सकाळ ग्रीन डे' उपक्रमांतर्गत रोपे लावण्यात आली. तत्पूर्वी, रोपांची लागवड, संगोपन आणि संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली. खासदार रामदास तडस, वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी आदींनी मुलांशी संवाद साधला व वृक्षारोपण केले.

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांसह सहभागी मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. "सकाळ माध्यम समूहा'ने राबविलेल्या उपक्रमाचे सहभागी मान्यवरांनी कौतुक केले. लोहारा येथील साई विद्यालयात आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे याने वृक्षारोपण केले.

उपक्रमास प्रतिसाद
चंद्रपूर : जिल्ह्यातील आठ शाळांमध्ये वृक्षारोपण
गडचिरोली : विविध शाळांमध्ये "सकाळ'तर्फे ग्रीन डे.
भंडारा : जिल्ह्यात "ग्रीन डे' मोठ्या उत्साहात साजरा
गोंदिया : जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ.

दृष्टिक्षेपात "सकाळ ग्रीन डे'
व्याप्ती - विदर्भातील 11 जिल्हे
सहभाग - 200 शाळा
विद्यार्थी - 1 लाख
वृक्षारोपण - 20 हजार रोपे

Web Title: nagpur vidarbha news sakal green day in vidarbha school