‘दबंग’ म्हणाला, ‘कमिटमेंट करते हो तो निभाओ’

नागपूर - महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर अभिनेता सलमानच्या हातात ब्रेसलेट घालताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
नागपूर - महोत्सवाच्या उद्‌घाटनानंतर अभिनेता सलमानच्या हातात ब्रेसलेट घालताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

नागपूर - ‘नमस्कार, सत श्री अकाल, आदाब म्हणत भाषणाला सुरुवात करणाऱ्या बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमान खानने नागपूरकरांना ‘कमिटमेंट करना नहीं, सेफ रहते हो. कमिटमेंट करते हो तो उसे निभाओ’, असा सल्ला देत नागपूरकरांच्या टाळ्या घेतल्या. स्वतःच्या चित्रपटातील ‘डायलॉग’द्वारे चाहत्यांना ‘टिप्स’ दिल्याच, शिवाय त्याने ‘ढिंक चिका’ गीतावर थिरकत रसिकांची मनेही जिंकली.

हजारो नागपूरकरांच्या साक्षीने क्रीडा चौकातील ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे सलमान खानच्या हस्ते थाटात उद्‌घाटन झाले. यावेळी केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, पार्श्‍वगायक सुदेश भोसले यांच्यासह शहरातील सर्व आमदार, मनपातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी नागपूरनगरीतर्फे सलमान खानचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर पालकमंत्री बावनकुळे यांनी सुदेश भोसले यांचा गौरव केला. उद्‌घाटनाच्या औपचारिकतेनंतर पुढील दहा मिनिटे ‘सबकुछ’ सलमान असेच कार्यक्रमाचे स्वरूप झाले. आकाशी निळा जिन्स, गर्द निळा शर्ट व त्यावर काळे लेदर जॅकेट परिधान करून आलेल्या सलमानला डोळ्यात साठवून ठेवतानाच मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांची स्पर्धा लागली. त्यामुळे मंचासमोर अचानक गर्दी झाली. सलमानने तीन तासांपासून प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना त्यांच्या ‘स्टाइल’ने उपदेश दिले. त्याने ‘टायगर जिंदा है’ला भरभरून प्रतिसाद दिल्याबाबत त्याने नागपूरकरांचे आभार मानले.

मात्र ‘ट्यूबलाइट’लाही असाच प्रतिसाद दिला असता तर बरे झाले असते, अशीही पुस्ती जोडताच प्रेक्षकांमधून शिट्ट्या, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट गुंजला. 

‘मुझपर एक अहसान करना, की मुझपर कोई अहसान न करना’ हा डायलॉग ऐकविताना त्याने कुणावरही उपकार केल्यास ते विसरून जाण्याचा सल्ला त्याने दिला. नुकताच सुपरहिट झालेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील ‘टायगर जैसा शिकार कोई नहीं करता’ या संवादाचा अर्थ सांगत त्याने आपल्या कामात तरबेज व्हा, असे आवाहन करीत ‘थॅंक्‍यू नहीं बोलने का, रिटर्न में तीन आदमी की मदत करने का’, असा उपदेश यावेळी केला. त्यानंतर ‘ढिंक  चिका... ढिंक चिका’ या गीतावर नृत्य करीत नागपूरकरांना थिरकवले तर ‘मै हूं हिरो तेरा..’ हे गीत सादर करीत स्वतःच्या गायनशैलीशीही रसिकांना परिचित करून दिले.

सलमान संवेदनशील समाजसेवक - गडकरी 
सलमान खानने अनेक गरजू व गरिबांच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी मदत केली. तो नेहमीच गरिबांच्या पाठीशी उभा राहत असून संवेदनशील समाजसेवक असल्याचे यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. सलमानचे सामाजिक काम मोठे असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सलमानला ब्रेसलेटही भेट दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com