पाच नव्हे अडीचपटच मोबदला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात येत आहे. हिंगणा भाग मेट्रोमध्ये आहे. मेट्रो भागासाठी शासनाने गुणांक एक निश्‍चित केला आहे. सानुग्रह अनुदान शंभर टक्केनुसार बाजारभावाच्या दुप्पट मोबदला होता. वाटाघाटीतून अडीचपट रक्कम देण्यात येत आहे.
- बाळासाहेब काळेकर, एसडीओ, नागपूर ग्रामीण.

"समृद्धी'बाबत शेतकऱ्यांचा आरोप; जास्त रकमेची मागणी
नागपूर - प्रकल्पासाठी जमीन घेताना शेतकऱ्यास पाचपट मोबदला देण्याचा दावा शासनाकडून करण्यात आला. मात्र, समृद्धी महामार्गासाठी जमीनधारकास फक्त अडीचपट मोबदलाच दिला जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मोबदल्याची रक्कम वाढवावी, अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे.

नागपूर ते मुंबई (ठाणे)पर्यंत एक्‍स्प्रेस हायवे (समृद्धी महामार्ग) तयार करण्यात येत आहे. यासाठी महामार्गावर प्रत्येक ठराविक किलोमीटरवर नवीन शहरे विकसित करण्यात येणार आहेत.

जमीन संपादन करताना शासनाने पाचपट मोबदला देण्यात येईल, असे जाहीर केले होते. हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मात्र यासाठी अडीचपटच मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे शासनाची घोषणा फसवी असल्याची चर्चा आहे. शासनाकडून पाचपट मोबदल्याचे आश्‍वासन कोणत्या आधारे दिले, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील हिंगणा तालुक्‍यातून समृद्धी महामार्गाचा 28 किलोमीटरचा रस्ता आहे. यासाठी 279 शेतकऱ्यांची (सर्व्हेनंबर) जमीन 207 हेक्‍टर जागा संपादित करायची आहे. आतापर्यंत 26 शेतकऱ्यांची 19.73 हेक्‍टर जागा संपादित केली असून, त्यांना 17 कोटी 93 लाख 6 हजार 38 रुपये मोबदला दिला आहे.

मेट्रो रिजनचा आराखड्याला मंजुरी?
हिंगणा तालुका मेट्रो रिजन क्षेत्रात येते. मेट्रो रिजनाचा आराखडा तयार केला असून, शासनाकडून अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे. मात्र, प्रशासनाकडून हा भाग मेट्रोमध्ये असल्याने गुणांक एकप्रमाणे मोबदला देण्यात येत असल्याने मेट्रो रिजनचा आराखडा मंजूर झाला, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. आराखडा मंजूर झाला नसेल, तर गुणांक कोणत्या आधारे लावला, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Web Title: nagpur vidarbha news samruddhi highway Remuneration