संदीप सहारे हे वनवे गटातून बाहेर पडणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

नागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत हे विश्‍वासात घेत नाहीत, कुठलाही निर्णय घेताना महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते विचारत नाहीत, बैठकांना बोलवत नसल्याने नाराज झालेले ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी तानाजी वनवे गटातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. उद्या ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, कारणे दाखवा नोटीसमुळे बंडखोरांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

नागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत हे विश्‍वासात घेत नाहीत, कुठलाही निर्णय घेताना महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते विचारत नाहीत, बैठकांना बोलवत नसल्याने नाराज झालेले ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे यांनी तानाजी वनवे गटातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. उद्या ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, कारणे दाखवा नोटीसमुळे बंडखोरांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

संदीप सहारे यांनी चारवेळा उत्तर नागपुरातून महापालिकेची निवडणूक जिंकली आहे.  महापालिकेचे विरोधीपक्षनेतेसुद्धा होते. नितीन राऊत यांचे ते समर्थक मानले जातात. काँग्रेसच्या गटतेनेपद निवडताना सेवाज्येष्ठतेनुसार त्यांचेही नाव घेतले जात होते. काँग्रेसने संजय  महाकाळकर यांची नियुक्ती केली. यानंतर चतुर्वेदी-राऊत-अहमद या माजी मंत्र्यांनी नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन केला.

प्रदेशाच्या निर्णयाला आव्हान देऊन बंडखोरी केली. तानाजी वनवे यांना गटनेता केले. एकूण सोळा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विभागीय आयुक्तांना गटनेता बदलण्याचे निवेदन दिले. त्यानुसार वनवे यांची नियुक्ती करण्यात आली. वनवे गटातर्फे महापालिकेचे स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगरसेवक किशोर जिचकार यांचा अर्ज दाखल केला. या दरम्यान झालेल्या बैठकांमध्ये सहारे यांना बोलाविण्यातसुद्धा आले नाही. उत्तर नागपूरचे प्रतिनिधी म्हणून संजय दुबे यांना पाठविण्यात येते. यामुळे संदीप सहारे चांगलेच नाराज आहेत.

आज वनवे गटाची बैठक
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना कारवाईचा अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे ठाकरेविरोधी गटामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या संदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी चतुर्वेदी यांच्या घरी उद्या, गुरुवारी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत संदीप सहारे आपला फैसला कळवणार असल्याचे कळते. 
 

बंडखोरांमध्ये धास्ती 
कारणे दाखवा नोटीसचा मजकूर तयार झाला आहे. उद्या, गुरुवारी तानाजी वनवे यांच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या करणाऱ्या नगरसेवकांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचे सिद्ध झाल्यास पक्षातून बडतर्फ करण्यात येणार आहे. यामुळे काही सदस्यांचे नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. याची अनेक नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे.

Web Title: nagpur vidarbha news sandeep sahare out in vanave group