चमचमीत जेवणाची सवय मोडली - सविता जगताप

चमचमीत जेवणाची सवय मोडली - सविता जगताप

नागपूर - ‘‘केवळ गृहिणीवर्गाकडेच घरातील किरकोळ खर्चासाठी जपून ठेवलेल्या नोटा असायच्या. त्यामुळे कसाबसा महिना निघून जायचा. नोटाबंदीनंतर मात्र घरातील बजेटच बिघडले. ते आतापर्यंतही ताळ्यावर आले नाही. नोटाबंदीमुळे गृहिणींच्या स्वयंपाकघरावर मोठा परिणाम झाला. आठवड्यातून एकदा तरी चमचमीत जेवण करण्याची सवय मोडली’’, अशी खंत सविता जगताप यांनी व्यक्त केली. 

त्या म्हणाल्या, ‘‘घरातील खर्चासाठी पतीकडे पैसे मागितल्यास नोटाबंदीचे कारण सांगून पतिदेव स्वतःची सुटका करून घेत होते. शेजारी किंवा मैत्रिणींकडून हातउसनवारी करावी तर तिकडेही स्थिती सारखीच. त्यामुळे नोटाबंदीने सर्वाधिक कोंडी महिलावर्गाची झाली. घरातील लहान मुलांच्या गुल्लकमधील पैसे काढण्याची वेळ आईवर आली. मोठ्या जड अंत:करणाने मुलांच्या पैशातून घरात आवश्‍यक असलेले सामान आणण्याची वेळ आली होती.

मुलांच्या शाळेचे शुल्क भरण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी तर खूप अडचण गेली. नोटाबंदीचा परिणाम आजही स्वयंपाकघरात स्पष्टपणे जाणवत आहे. अचानक मनावर आघात व्हावा, अशा स्थितीतून आता कुठेतरी सावरत असल्याची जाणीव होत आहे. महिलांनी अनेक अडचणींवर मात करीत नोटाबंदीला तोंड दिले आहे.’’ 

डिजिटलकडे कल 
नोटबंदीमुळे दहशतवाद्यांना मिळणाऱ्या काळ्या पैशांवर आळा बसला. भ्रष्ट नेत्यांना त्याचा काळा पैसा गमवावा लागला. भारतात नेहमी कॅश इकोनॉमीला चालना आहे. पण, डिजिटल इकोनॉमीकडे लोकांचा कल वाढताना दिसतो आहे. एका अहवालानुसार नोव्हेंबर २०१६मध्ये कॅशलेस व्यवहार ६७.२ कोटी होता. तोच फेब्रुवारी २०१७मध्ये ७६.३ कोटी झाला. पण, दुसरीकडे छोट्या उद्योगांना त्याचा फटका बसला. नगदी रोख रक्कमेअभावी धंदे बंद पडले. काहींना नोकरी गमवावी लागली. 
- ऋषिकेश देशपांडे, अभ्यंकर नगर

एक हजारांची नोट हवी
नोटाबंदी ही काळा पैसा बाहेर यायला हवा म्हणून केली होती. तशी घोषणाही करण्यात आली. परंतु, किती काळा पैसा आला, हे समोर आलेले नाही. जर काळा पैसा सरकारकडे आला आहे, तर त्याचा वापर कशात केला गेला. काळा पैसा येऊनही महागाई का वाढत आहे. या सगळ्या गोष्टींचा फटका गरिबांवरच का, नोटाबंदीने कुठलाच फायदा झालेला नाही. भविष्यात एक हजार रुपयांची नोट यावी, तिचा रंग ग्रे असावा.
- कल्याणी मुळे, तुकडोजी चौक

डिजिटलचे धडे द्या
कोणताही नवीन निर्णय असो की, योजना. अंमलबजावणी होताना वेळ लागतो. एखाद्या बदलाची क्रांती होत असेल तर फायदे आणि तोटेही होतात. निर्णयाच्या प्रारंभीच्या काळात कळ सोसली. अनेक व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे ऑनलाइन व्यवहार वाढत गेले. पण, सामान्य माणूस आजही डिजिटल साक्षर नाही. त्यांनी कसा व्यवहार करावा, याचाही विचार होणे अपेक्षित होते. आता शालेय शिक्षणापासून डिजिटलचे धडे द्यावेत. व्यवहार सुलभ होईल.
- स्नेहल साखरकर, बेसा, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com