राज्यातील पुलांवर लागणार सेंसर

नीलेश डोये
सोमवार, 3 जुलै 2017

नदी धोक्‍याच्या पातळीवर येताच मिळणार अलर्ट  

नागपूर - महाड येथील सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेला. मनुष्यहानी झाली. त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने पुलावर सेंसर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यास मदत होणार आहे. 

नदी धोक्‍याच्या पातळीवर येताच मिळणार अलर्ट  

नागपूर - महाड येथील सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेला. मनुष्यहानी झाली. त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने पुलावर सेंसर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यास मदत होणार आहे. 

पावसाळ्यात नद्यांचे पाणी पुलावरून वाहू लागते. याची माहिती नसल्याने मोठी दुर्घटना होते. अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागते आणि पाणी पुलावर धोक्‍याच्या पातळीवर येते. त्याची माहिती मिळावी म्हणून सध्या कोणतीच यंत्रणा नव्हती. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. महाड येथील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर शासनाने प्रत्येक पुलावर आपत्ती व्यवस्थापकाची नियुक्ती करण्याचे आदेश होते. पावसाळा सुरू झाल्यावरही अद्याप यावर अमल करण्यात आला नाही. आता निधीच्या अडचणीमुळे ही नियुक्ती रखडण्याची शक्‍यता आहे.  राज्यात अनेक पूल ब्रिटिशकालीन आहेत. तर, काही पुलांची स्थिती वाईट आहे. काही नदीवरील पुलांची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी पुलावरून वाहते.

यामुळे रात्रीच्या सुमारास दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. महाड येथील सावित्री नदीवरील पूलही रात्रीच्या वेळी पुरामुळे वाहून गेला. पूल वाहून गेल्याची माहिती कुणालाही कळली नाही. यामुळे अनेकांचा जीव गेला. इतर जिल्ह्यातही पुलावरून नदीचे पाणी वाहून अनेक दुर्घटना झाली आहेत. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने महाडच्या घटनेनंतर प्रत्येक पुलावर आपत्ती व्यवस्थापकाची  नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, पुलावर सेंसर लावण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाचे घेतला आहे.

आपत्ती व्यवस्थापकांची नियुक्ती केव्हा?
नदीवर आपत्ती व्यवस्थापकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करायची होती. या व्यवस्थापकांना प्रशिक्षण देऊन २४ तास पुलावर पाहणी करायची होती. पावसाळा सुरू झाल्यावर आतापर्यंत या आपत्ती व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली नाही. 

प्रत्येक जिल्ह्यातील १५ ते २० पुलांवर हे सेंसर लावण्यात येणार आहेत. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. नदीचे पाणी पुलावर धोक्‍याच्या पातळीवर येताच या सेंसरच्या माध्यमातून याची माहिती प्रशासनाला मिळेल. यामुळे या पुलावरील वाहतूक थांबवून आवश्‍यक दुरुस्तीचे कामही करता येईल.
- उल्हास देबडवार, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: nagpur vidarbha news sensor on river brige