‘सेवाग्राम’ची धाव नाशिकपर्यंतच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नागपूर - मुंबईत रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे नागपूर स्थानकावरून शनिवारी रात्री रवाना होणारी सेवाग्राम एक्‍स्प्रेस नाशिकपर्यंतच धावणार आहे. या फेरबदलाची माहिती ऐनवेळी मिळाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अनेकांनी नागपूर स्थानकावरील टीसी आणि उपस्टेशन व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून त्रागा व्यक्त केला.

नागपूर - मुंबईत रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे नागपूर स्थानकावरून शनिवारी रात्री रवाना होणारी सेवाग्राम एक्‍स्प्रेस नाशिकपर्यंतच धावणार आहे. या फेरबदलाची माहिती ऐनवेळी मिळाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अनेकांनी नागपूर स्थानकावरील टीसी आणि उपस्टेशन व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून त्रागा व्यक्त केला.

सेवाग्राम एक्‍स्प्रेस दररोज नागपूर ते मुंबईच्या सीएसटी स्थानकादरम्यान धावते. मुंबईत रेल्वेमार्गावर करण्यात येणाऱ्या कामांसाठी रेल्वेतर्फे ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, बऱ्याच गाड्या ब्लॉक दरम्यान रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवल्या जाणार आहेत. काही गाड्या निर्धारित स्थानकापूर्वीच संपविण्यात येणार आहे. नागपूरहून सुटणारी सेवाग्राम एक्‍स्प्रेस नाशिकपर्यंतच चालविण्यात येणार असून नाशिक ते सीएसटी दरम्यान ती रद्द करण्यात आला आहे. 

दुपारी ३ ते ३.४५ दरम्यान एसएमएसने प्रवाशांना याची सूचना देण्यात आली. अचानक मिळालेल्या या माहितीमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. मुंबईत अत्यावश्‍यक कामे असणारे पर्यायी व्यवस्थेसाठी रेल्वेस्थानकावर पोहचले. परंतु, कुठेच समाधानकारक माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. मुंबईतील कामे पूर्वनियोजित असताना गाडी रद्द करण्याचा निर्णय पूर्वीच का कळविण्यात आला नाही, या प्रवाशांच्या प्रश्‍नावर अधिकाऱ्यांकडेही उत्तर नव्हते.

विद्यार्थी, चाकरमान्यांची सर्वाधिक गैरसोय
राज्यात महाविद्यालयीन प्रवेशाचे सत्र सुरू आहे. यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची मुबईवारी सुरू आहे. शिवाय कामाच्यानिमित्ताने मुंबई वारी करणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठी आहे. यासर्वांना नियोजित वेळेत मुंबई गाठणे आवश्‍यक आहे. पण, सेवाग्राम नाशिकलाच थांबणार असल्याने चाकरमाने आणि विद्यार्थ्यांची सर्वाधिक गैरसोय झाली. नाशिकला उतरून ठरल्यावेळेत मुंबई गाठायची कशी असा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. देवनगर येथील रहिवासी आलोक चरडे या विद्यार्थ्याला हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रवेशासाठी रविवारी दुपारी ३ पर्यंत मुंबई गाठणे आवश्‍यक आहे. सेवाग्रामचे कनफर्म तिकीटही होते. पण, नाशिकला उतरून मुंबईत तीन पूर्वी पोचायचे कसे, असा प्रश्‍न करून तो पर्यायी व्यवस्थेसाठी रेल्वे अधिकाऱ्यांना विनवणी करीत होता.

शुल्क परताव्याबाबत संभ्रम
गाडी नाशिकपर्यंतच धावणार असल्याने प्रवाशांना तिकीट रद्द करून पूर्ण पैसे परत देण्याचे प्रशासनाने जाहीर केले. पण, ऑनलाइन तिकीट घेणाऱ्यांना पैसे कसे परत मिळतील, याबाबत स्पष्टता नव्हती. अधिकाऱ्यांच्या उत्तरांमध्येही भिन्नता होती. काहींनी टीडीआर फाईल करणाऱ्यांनाच परतावा मिळू शकणार असल्याचे सांगितले. शिवाय नागपूर - नाशिक प्रवास करणाऱ्यांना उर्वरित प्रवासाचे किती पैसे परत मिळतील आणि ते कसे मिळवायचे, याबाबत अधिकाऱ्यांकडेही माहिती नव्हती. 

Web Title: nagpur vidarbha news sevagram express go to nashik