सौंदर्य स्पर्धेतील मिसेस युनिव्हर्स लवलीला वैदर्भीय साज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

नागपूर - मिसेस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स लव्‍हलीचा खिताब पटकावणाऱ्या शिल्पा अग्रवाल यांनी वैदर्भीय विणकरांनी हातमागावर तयार केलेल्या वस्त्रांचा उपयोग केला. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे निर्मित साज विदेशात आकर्षणाचे केंद्र ठरल्याची माहिती महामंडळाचे सहसंचालक विजय निमजे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर - मिसेस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स लव्‍हलीचा खिताब पटकावणाऱ्या शिल्पा अग्रवाल यांनी वैदर्भीय विणकरांनी हातमागावर तयार केलेल्या वस्त्रांचा उपयोग केला. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे निर्मित साज विदेशात आकर्षणाचे केंद्र ठरल्याची माहिती महामंडळाचे सहसंचालक विजय निमजे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळातर्फे विदर्भातील विणकरांना नवीनतम प्रकारच्या उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. नवीन प्रकारच्या सिल्क टसर साडी, ड्रेस मटेरिअल, स्कार्फ स्टोल, दुपट्टा, शर्ट, पोटली इन्डो वेस्टर्न, अहिंस सिल्क आदी उत्पादनांची नवीन श्रुंखला साकारण्यात येत आहे. स्पर्धेचा सामना करण्यासाठी उत्पादनांना आधुनिकतेची जोड देण्यात येत असून त्यासाठी राष्ट्रीय स्तराच्या डिझायनर्सचे सहकार्य घेण्यात येत आहे. नागपुरातील निधी गांधी हातमाग महामंडळातर्फे निर्मित वस्त्रांचा उपयोग करून नऊवारी साडी, लहंगा-चोली, दुपट्टा साफा फायनल केला.

दक्षिण आफ्रिकेतील दरबन येथे आयोजित मिसेस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत नागपूरकर शिल्पा अग्रवाल यांनी हीच वस्त्रे परिधान करून प्रदर्शन केले. उपस्थित सर्वांनीच या वस्त्रप्रावरणाला भरभरून दाद दिली. त्याच बळावर त्यांनी मिसेस युनिव्हर्स लव्‍हली खिताब पटकावला. स्पर्धेच्या निमित्ताने हातमाग कारागिरांद्वारे निर्मित वस्त्रांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचा विदर्भातील पारंपरिक कारागिरांना भविष्यात लाभ होईल, असा विश्‍वास निमजे यांनी व्यक्त केला. महामंडळाद्वारे ‘मागेल त्याला काम’ याप्रमाणे इच्छुकांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला मिसेस युनिव्हर्स लव्‍हली शिल्पा अग्रवाल, निधी गांधी, महामंडळाचे वित्त अधिकारी भीमराव झाडे, विपणन अधिकारी वासुदेव मेश्राम उपस्थित होते.

मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत हातमाग महामंडळाकडून मोठे सहकार्य मिळाले. विदर्भातील हातमाग कारागिरांनी तयार केलेल्या वस्त्रांचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर करता आले, याचा आनंद आहे. यापुढेही हातमाग वस्त्रांच्या प्रसिद्धीसाठी आवश्‍यक ते सहकार्य करणार आहे. महामंडळाने ब्रॅंड ॲम्बेसिडर नेमल्यास आनंदच होईल.
- शिल्पा अग्रवाल, मिसेस युनिव्हर्स लव्‍हली

Web Title: nagpur vidarbha news shilpa agarwal