शॉर्टसर्किटमुळे हादरले रेल्वेस्थानक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नागपूर - भूमिगत केबलमध्ये झालेल्या जोरदार स्फोटांच्या मालिकेमुळे मंगळवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानक हादरले. ऐन गाड्या येण्याच्या वेळीच ही घटना घडल्याने  प्रवाशांमध्ये दहशत पसरली. अनेकांची सुरक्षित स्थळाच्या शोधात पळापळ झाली. शेजारीच असलेल्या इंडियन ऑइलच्या डेपोला या घटनेमुळे धोका निर्माण झाला होता. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी धाव घेऊन केलेल्या उपाययोजनेमुळे अनर्थ टळला.

सकाळच्या वेळी फलाट क्रमांक १ वर सर्वाधिक व्यस्त असतो. एकामागून अनेक प्रवासी गाड्या येत असल्याने प्रवाशांची गर्दी असते. नेमक्‍या त्याचवेळी फलाट क्रमांक १ वर मुंबई एन्डच्या दिशेकडील व्हीपी लोडिंग यार्डजवळल डीपीच्या भूमिगत केबलमध्ये स्फोट होऊ लागला. या घटनेमुळे प्रारंभी फटाक्‍यांच्या पार्सलला आग लागल्याची चर्चा पसरत गेली. जोरदार स्फोट होत असल्याने कुणीही जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही. काही वेळातच धुरामुळे फलाटाचा भाग झाकोळला गेला. सुमारे २० मिनिटे स्फोटांची मालिका कायम राहिल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी हा वेगळाच प्रकार असल्याचे हेरले. काहींनी जवळ जाऊन स्फोटाचे कारण शोधले. त्यावेळी भूमिगत केबल जळत असल्याचे दिसून आले. डीपी आपोटाप ट्रिप झाली तर  खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य सर्व्हरमधून फलाट क्रमांक १ वरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसाचे पाणी केबलमध्ये शिरल्याने ही घटना घडली असावी, असा कयास लावला जात आहे. 

घटनेप्रसंगी जवळच इंडियन ऑइलचे रेल्वे कन्झ्युमर डेपो आहे. स्फोट व आगीमुळे डेपोला धोका निर्माण झाला होता. रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एच. एल. मीणा यांनी इस्टिंगविशरच्या मदतीने रसायनाची फवारणी करीत आग व स्फोटांवर नियंत्रण मिळविले. 

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रणानंतर प्रशासनाकडून तातडीने केबल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. रात्रीपर्यंत केबल बदलण्याचे काम सुरू होते.

Web Title: nagpur vidarbha news short circuit on railway station