रुग्णसेवेसाठी विद्यार्थ्यांनी थाटले रसाचे दुकान

केवल जीवनतारे
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

नागपूर - दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके सत्कर्म दुसरे कोणतेही नाही. या सत्कर्मापासून जे समाधन मिळते ते पैशांत मोजता येत नाही. असेच समाधान दुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील विविध गावांत रुग्णसेवा करीत असलेले विद्यार्थी मिळवितात. विशेष असे, की हे रुग्णसेवेचे सत्कर्म करण्यासाठी मेडिकलमधील विद्यार्थ्यांनी "बीट', "लवकी', "कारल्या'चा रस विकण्याचे दुकान थाटले. या मिळकतीतून हे विद्यार्थी औषधे व इतर साहित्य खरेदी करणार आहेत.

मेळघाटातील आदिवासी जनतेला आरोग्यम शिबिराच्या माध्यमातून साहित्य देण्याचाही उपक्रम हे विद्यार्थी करतात. गतवर्षी या शिबिरासाठी सुपर स्पेशालिटीचे तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी अथक परिश्रमातून औषधासाठी निधी गोळा केला होता. परंतु, डॉ. श्रीगिरीवार यांची बदली यवतमाळ येथे झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवली. मेडिकल परिसरात सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी रसाचे दुकान थाटले. फळांचा, पालेभाज्यांचा रस विकून हे विद्यार्थी पैसे गोळा करीत आहेत.

मिळालेल्या पैशांतून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सेवाभावी उपक्रमाला हातभार लागणार आहे, हे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसून येत आहे.

तब्बल दोन महिन्यांचे नियोजन, दुर्गम भागातील गावांशी संपर्क व रुग्णांवर उपचार करून हे अभियान विद्यार्थी यशस्वीपणे राबविणार आहेत. पैशांअभावी या अभियानाला थांबा लागू नये, यासाठी चक्क रसाचे दुकान थाटून पैसे उभे करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यासाठी आपोआपच हात वर जातात. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला "सकाळ'ची साथ आहे. आठवडाभरापासून विद्यार्थ्यांनी दुकानातून होणारी मिळकत गोळा केली. विद्यार्थ्यांचे हे सत्कर्म व्यायाम करण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी आलेल्यांना ठाऊक झाल्यामुळे मदतीचे हात "रसा'च्या रूपाने बळ देत आहेत.

मेळघाटात सेवा...
जिथे रस्ते नाहीत, वीजही नीट पोचलेली नाही, पाण्याची भीषण समस्या आहे, त्या भागात रुग्णसेवा देण्याचा विचार मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना बोलून दाखविला. सहकार्याचे भक्कम पाठबळच डॉ. श्रीगिरीवारांनी उभे केले. विद्यार्थ्यांच्या ध्यासाला कृतीची ऊर्जा देण्याचे काम "सकाळ'च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मेळघाटात मेडिकलचे आरोग्यम शिबिर सुरू करण्यात येईल.

आदर्श निर्माण केला
राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी लाख, कोटी रुपये खर्चून आरोग्य शिबिरं घेत आहेत. यासाठी चक्क मेडिकल, मेयोपासून तर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांची मदत घेत आहेत. परंतु, मेडिकलमधील विद्यार्थ्यांनी या अनोख्या अभियानातून समाजापुढे रुग्णसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: nagpur vidarbha news sugarcane juice shop for patient service by student