आत्महत्या प्रतिबंधक सेल उरला नावापुरता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नागपूर - कौटुंबिक कलह, ताण-तणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की, डोक्‍यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्‍यातून होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने आत्महत्या प्रतिबंधक सेल तयार केला होता. अतिशय प्रभावी असे काम तीन वर्षे चालले. परंतु २०१६ पासून या सेलमार्फत होणारे काम मंदावले. सहा तास खुर्चीत बसून वेळकाढू धोरणाशिवाय दुसरे काम होत नसल्याची चर्चा येथे सुरू आहे. 

नागपूर - कौटुंबिक कलह, ताण-तणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की, डोक्‍यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्‍यातून होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने आत्महत्या प्रतिबंधक सेल तयार केला होता. अतिशय प्रभावी असे काम तीन वर्षे चालले. परंतु २०१६ पासून या सेलमार्फत होणारे काम मंदावले. सहा तास खुर्चीत बसून वेळकाढू धोरणाशिवाय दुसरे काम होत नसल्याची चर्चा येथे सुरू आहे. 

मानवी मन अतिशय संवेदनशील असते. आयुष्याचा गाडा सुंदर चालत असताना अचानक नैराश्‍य आले की, डोक्‍यात मानसिक आजारांतून आत्महत्त्येचा विचार डोक्‍यात डोकावतो. यातून आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाढती संख्या लक्षात घेता, मनोरुग्णालयात तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांच्या पुढाकारातून १५ डिसेंबर २०१० साली ‘आत्महत्या प्रतिबंधक सेल’ तयार करण्यात आला. पुढे याचा विस्तार करीत पूर्व विदर्भातील सर्व जिल्हा रुग्णालयात या ‘सेल’चे काम सुरू झाले. मात्र मनोरुग्णालयात ज्या गतीने काम सुरू होते, ती गती मात्र मंदावली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शेतकरी भेट योजना 
आत्महत्येचे नेमके कारण शोधून ‘समुपदेशन’ आणि ‘औषधोपचार’ करण्यात येथील पथकाने मोलाची कामगिरी केली होती. यासाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन समुपदेशन केले जात होते. ३१० शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. यांना या विचारापासून परावृत्त करण्याचे काम त्यावेळी झाले होते. याशिवाय अपयशाने खचून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नैराश्‍यातून आत्महत्येचे विचार येतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा कार्यक्रम या सेलअंतर्गत आखण्यात आला होता. 
 

आत्महत्या प्रतिबंधक सेलचे काम पूर्णपणे बंद झाले असे म्हणता येत नाही. येथे मनोरुग्णालयाचे कर्मचारी बसतात. समुपदेशनही सुरू आहे. नुकतेच सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात यासंदर्भात ऑक्‍टोबरमध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आला. दरमहा एक कार्यक्रम घेण्यात येतो. 
- डॉ. प्रवीण नवखरे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.

उपराजधानीत प्रादेशिक मनोरुग्णालयात स्थापन करण्यात आलेला ‘आत्महत्या प्रतिबंधक सेल’ राज्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. दर दिवसाला पाच आत्महत्या शहरात होत असल्याचे वास्तव पुढे आल्यानंतर शेतकरी आणि विद्यार्थी तसेच गृहिणी यांना आत्महत्येच्या विचारांपासून समुपदेशनातून परावृत्त करता येते, हे सेलमार्फत झालेल्या कार्यातून पुढे आले. सद्या या सेलमार्फत होणाऱ्या कामाची पुरेसी माहिती नाही. 
- डॉ. अभय गजभिये, माजी वैद्यकीय अधीक्षक, मनोरुग्णालय, नागपूर. 

Web Title: nagpur vidarbha news Suicide Prevention Cell For Names