याला सुपर ऐसे नाव...

याला सुपर ऐसे नाव...

नागपूर - धुणीभांडी करणारीने हातात पैसा नसल्याने सुपर स्पेशालिटी गाठले. डॉक्‍टरांनी सीटी स्कॅन सांगितले. अशाप्रकारे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतरही सीटी स्कॅन झाले नाही. दुसऱ्या दिवशी बोलावले. दुसऱ्या दिवशी डॉक्‍टरांची ओपीडी नव्हती. सीटी स्कॅन निघाल्यानंतर असह्य वेदना सहन करीत उपचाराशिवाय आठवडा घालवण्याशिवाय पर्याय नाही, ही भावना सुमित्राबाईंनी व्यक्त केली. 

दोन - रामराव सरोदे...(नाव बदलले) मेयोतून रेफर केले. सुपरमध्ये आल्यानंतर उपचार मिळतील, ही आशा होती. परंतु येथील डायलिसिस विभागात रुग्णांची गर्दी असल्याचे कारण सांगून परत पाठवण्यात आले. वॉर्डात तर परिचारिका जागची हलत नाही. गयावया केल्यानंतरही परिचारिकेला दया येत नाही. उलट उर्मटपणे परिचारिका बोलून गेली. 

तीन - साठीतील महिला. वर्षभरापासून डोकं दुखत असल्याने येथे आली. सहा महिन्यांपूर्वी येथे डॉ. श्रीगिरीवार होते, त्यांनी येथील डॉक्‍टरांना सांगितले. पहिल्या भेटीत उपचार झाले. परंतु, त्यानंतर उपचार झाले नाही. येथे मोफत औषधच मिळत नाही. गरीब माणूस पैसा नसल्याने सुपर स्पेशालिटी असो की, मेडिकल येथे उपचारासाठी येतात. परंतु सुपर आता गरिबांचे राहिलेच नाही, अशी भावना नसीम बेगम यांनी व्यक्त केली. अशी एक-दोन-तीन नव्हे तर पन्नासच्या वर नागरिकांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आलेले अनुभव कथन केले. दिवसभर सुपर स्पेशालिटीत उपचार होत नसल्याने वऱ्हांड्यात पडून असल्याचे चित्र नित्याचेच. सुपर स्पेशालिटी असे नाव असले तर आता सुपरचे नाव मोठे आणि दर्शन खोटे असल्याचे दिसून येत आहे. यालाच सुपर ऐसे नाव देता येईल. गरिबांच्या आवाक्‍यात खासगीतील उपचार नसल्याने गरिबांची धाव सुपरकडे आहे. दर दिवसाला एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी येथे होते. ह्रदयविकार, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्युरोलॉजी, नेफ्रोलाजी, सीव्हीटीएस अशा अनेक आजारांवर सुपर वरदान ठरत आहे. परंतु अलीकडे गरिबांच्या जीवाची येथे किंमत केली जात नाही. सुपर स्पेशालिटीतील चित्र आता मेडिकलसारखे झाले आहे. येथील डॉक्‍टरांच्या केबीनसमोर रुग्णांऐवजी ‘एमआर’ गर्दी करताना दिसतात.  

शस्त्रक्रिया, न्युरोलॉजीत ‘वेटिंग लिस्ट’ 
सुपरमध्ये किडनी प्रत्यारोपण सुरू झाले, ही भूषणावह बाब आहे. परंतु, ‘सीव्हीटीएस’ विभागात हृदयविकाराच्या शस्त्रक्रियांची ‘वेटिंग लिस्ट’ वाढली. ही चिंतेची बाब आहे. विशेष असे की, यावर उतारा म्हणून येथे कार्यरत डॉक्‍टरने वेगळीच शक्कल लढविली. येथील डॉक्‍टर खासगी रुग्णालयात रेफर करून तेथे लगेच शस्त्रक्रिया करण्याचे अफलातून प्रयोग सुरू आहेत. सुपरमध्ये बायपास सर्जरीची सोय असताना खासगी रुग्णालयात हलवण्यामागचे अर्थकारण सुपरमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांना कळले आहे. महात्मा फुले जनआरोग्याअंतर्गत मंजूर निधीसह पुन्हा अतिरिक्त पैसे देऊन शस्त्रक्रियेचे बील अदा केले जाते, हा सारा प्रकार प्रशासनाला ठाऊक आहे. परंतु सारे बघ्याची भूमिका घेतात.  

मदतकेंद्र अडगळीत... दारूची बाटली
विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या काळात तयार झालेले मदतकेंद्र दिसत नाही. त्यावेळी तयार करण्यात आलेल्या मदतकेंद्राचा फलक असा अडगळीत पडून आहे. तर वरच्या माळ्यावर प्रवेश करताना दारूची बाटली कोणीतरी कोपऱ्यात टाकली. असे चित्र सुपरमध्ये दिसू लागले आहे. 

नातेवाईक उघड्यावर... कधी मिळेल निवारा? 
भीक मागून आयुष्य जगणाऱ्या रस्त्यावरील बेघरांना रात्री झोपण्यासाठी शहरात निवारा मिळतो. खास ‘नाइट शेल्टर’ बांधले आहेत. परंतु, सुपर स्पेशालिटीत उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अडीच दशकांपासून निवारा नाही. रुग्ण वॉर्डात भरती असताना नातेवाईक मोकळ्या आकाशात रात्र काढतात. सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या भोजनाच्या तयारीसाठी विटा-दगडांची चूल मांडून येथे नातेवाइकांचा संसार फुलतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांची राहुटी सुपर परिसरात असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com