सुरेश भट सभागृहाचा लोकार्पण सोहळा ‘लाइव्ह’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नागपूर - बहुप्रतीक्षित अशा कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २२) देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. उद्‌घाटन सोहळ्याची जय्यत तयारी तसेच सुरक्षा यंत्रणेची रंगीत तालीम सध्या सभागृह आणि रेशीमबाग परिसरात सुरू आहे. रेशीमबाग मैदान, चौकांमधील व्हिडिओ स्क्रीन आणि महापालिकेच्या फेसबुक पेजवर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने सर्वांनाच सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी असणार आहे.

नागपूर - बहुप्रतीक्षित अशा कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २२) देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. उद्‌घाटन सोहळ्याची जय्यत तयारी तसेच सुरक्षा यंत्रणेची रंगीत तालीम सध्या सभागृह आणि रेशीमबाग परिसरात सुरू आहे. रेशीमबाग मैदान, चौकांमधील व्हिडिओ स्क्रीन आणि महापालिकेच्या फेसबुक पेजवर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने सर्वांनाच सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी असणार आहे.

दुपारी ४.१५ वाजता सभागृहाचे उद्‌घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव असतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संपूर्ण नागपूरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले कविवर्य सुरेश भट सभागृह म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. वर्षातील तीन महिने सौरऊर्जेवर संपूर्ण वीजयंत्रणा चालविता येईल, अशी व्यवस्था आहे. १९८८ एवढी प्रेक्षकक्षमता असलेले हे सांस्कृतिक सभागृह कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृती चिरकाळ जपणारे असेल, असे महापौर नंदा जिचकार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक दिव्या धुरडे, नगरसेवक ॲड. निशांत गांधी, मनपा आयुक्त अश्‍विन मुद्‌गल, वास्तुविशारद अशोक मोखा यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. गेली सहा वर्षे या सभागृहाचे काम सुरू आहे. सुरुवातीला ३४ कोटींचा असलेला हा प्रकल्प बांधकामाला उशीर झाल्याने तसेच नव्याने मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने ७५ कोटी रुपयांपर्यंत गेला. या सभागृहाचा वापर सांस्कृतिक कार्यक्रमांसह राजकीय सभा व बैठकांसाठीदेखील करता येणार आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सभागृहाचे भाडे अद्याप निश्‍चित झालेले नसून या महिन्याच्या अखेरीस स्थायी समितीच्या बैठकीत ते ठरविण्यात येईल, असे संदीप जोशी यांनी सांगितले. ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सभागृह कार्यक्रमांसाठी खुले होण्याची शक्‍यता आहे. 

हौशी आणि व्यावसायिक कलावंतांच्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळे भाडे आकारण्यासंदर्भातही यावेळी निर्णय होणार आहे. खासगी संस्थेला सहा महिने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी सभागृह देण्यात येईल. यासाठी ऑनलाइन निविदा लवकर निघणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  

सुरेश भटांचा अर्धाकृती पुतळा
सभागृहाला कविवर्य सुरेश भट यांचे नाव देण्यात आले. पण, या ठिकाणी भटांचा पुतळा असेल की नाही, याबाबत अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, उद्‌घाटन सोहळ्याच्या दिवशीच कविवर्य सुरेश भट यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणही होणार आहे. 

चित्तरंजन भट यांची उपस्थिती
सुरेश भट यांचे सुपुत्र व सुप्रसिद्ध गझलकार चित्तरंजन भट खास या सोहळ्यासाठी नागपुरात येणार आहेत. सुरेश भट यांच्या पत्नी पुष्पा भट यांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते, मात्र प्रकृतीच्या कारणाने त्या उपस्थित होऊ शकणार नाहीत. ‘नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे भव्य सभागृहाच्या निमित्ताने सुरेश भट यांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यात आले आणि देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होऊ घातलेय, याचा मनापासून आनंद आहे. या सांस्कृतिक सभागृहासाठी मी समस्त नागपूरकरांचे अभिनंदन करेन,’ अशा भावना चित्तरंजन यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

पद्मश्री पद्मजा फेणाणी यांची मैफल
लोकार्पण सोहळ्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रसिकांना पहिलावहिला सांस्कृतिक नजराणा गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाच्या रूपाने मिळणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘केव्हा तरी पहाटे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरेश भट यांच्या कविता आणि गझलांच्या सादरीकरणासह त्यांच्या खास पत्रांच्या स्मृतींना पद्मजा फेणाणी-जोगळेकर उजाळा देतील. यावेळी समोरच्या रांगांमधील १०० खुर्च्या राखीव राहतील. तर नागपूरकर रसिकांना या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश असणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news suresh bhatt auditorium inauguration