शिकण्यासाठी सुवर्णाची एकाकी झुंज

शिकण्यासाठी सुवर्णाची एकाकी झुंज

आर्थिक कोंडीमुळे समाजाकडून मदतीची अपेक्षा

नागपूर - घरची परिस्थिती बेताची. त्यातच वडिलांच्या जाण्याने उदरनिर्वाह कठीण. शिकण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून मामाने मदतीचा हात दिला आणि शिक्षणाची गंगा प्रवाहित झाली. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि भीषण अपघातात मामाला कायमचे अपंगत्व आले. एकमेव आश्रयदाताच कोलमडल्याने तिचा शिक्षणाचा डाव अर्ध्यावर कोलमडण्याची शक्‍यता असून, दानदात्यांनी मदत केल्यास शैक्षणिक प्रवास अखंड राहू शकतो.

सुवर्णा महादेवराव कोटजावळे असे या दुर्दैवी मुलीचे नाव. कोटजावळे कुटुंबीय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील नरखेड तालुक्‍यातील पिठोरी गावचे. आदिवासीबहुल आणि दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने गावात मूलभूत सुविधांचा अभाव. शिक्षणाचा गंधही नसल्याने येथील बरेच कुटुंबीय निरक्षर आहेत. मात्र, कोटजावळे कुटुंबातील सुवर्णा बालपणापासून हुशार. मजुरी करणाऱ्या आई-वडिलांसमोर तीन अपत्यांसह स्वत:चा रोजचा पोटाचा प्रश्‍न सोडविण्याचे संकट. गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे शिकण्याची धडपड पाहून केंद्रीय पोलिस दलात कार्यरत मामा वासुदेव नेहारे यांनी तिला आधार दिला. शिक्षणासाठी आपल्या गावी आणले. जिद्दी सुवर्णाही मामाच्या गावी मन लावून शिकू लागली. वडिलांच्या निधनाने जराही न डगमगता दहावीत ८५ टक्‍के गुण घेतले. 

हुशार भाचीच्या शिक्षणासाठी मामाही वाट्टेल ते करण्यास तयार झाले. तथापि, ही व्यवस्था नियतीला मंजूर नसावी. ११ जून २०१६ रोजी कळमेश्‍वरहून गोंडीमोहगावला परतत असताना वासुदेव नेहारे यांचा भीषण अपघात झाला. सुदैवाने जीव वाचला; पण कायमस्वरूपी अपंगत्व आले. दोन्ही पाय गेल्याने वर्षभरापासून ते अंथरुणावर आहेत. स्वत:वरील उपचाराचा खर्च करताना नेहारे यांनी सुवर्णाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. तिने बारावीत ८९ टक्‍के गुण घेतले. वडिलांच्या जाण्याने आईवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. पोटाशी तीन अपत्य असल्याने त्यांचे उदरभरण आणि शिक्षण करण्यास ती असमर्थ आहे. अपंग मामालाही तिच्या पुढील शिक्षणाचा भार पेलवणारा नाही. सुवर्णाने बीए प्रथम वर्षासाठी काटोल येथील नबिरा महाविद्यालयात प्रवेश घेतला असून, तेथील राहणे, शिक्षण हा साराच खर्च तिच्या आवाक्‍याबाहेर आहे. सुवर्णाला समाजातून मदतीची अपेक्षा आहे. इच्छुकांना वासुदेव नेहारे यांच्याशी ८६९८५७८५६४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सुवर्णाची जिद्द आणि चिकाटीला आर्थिक जोड देण्याची गरज आहे. परंतु, दोन्ही पायांनी अपंग असल्याने वर्षभरापासून अंथरुणावर आहे. नोकरीतून मिळणाऱ्या भरपाईतून उपचार आणि उदरनिर्वाह कठीण आहे. हुशार सुवर्णाला समाजातून मदत मिळाल्यास तिच्या शिक्षणाच्या स्वप्नाला बळ मिळू शकते.
- वासुदेव नेहारे, सुवर्णाचे मामा

शासकीय सुविधांपासून वंचित
गरीब आणि मागासवर्गीयांसाठी शासनाच्या अनेक सुविधा आहेत. आदिवासीबहुल क्षेत्रात रहिवासी कोटजावळे कुटुंबीय एसबीसी प्रवर्गात मोडते. या वर्गाला शासनाच्या सुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे सुवर्णा शासकीय वसतिगृह तसेच इतर सुविधांपासून वंचित आहे. 

आर्थिक अडचणींमुळे शिक्षण स्वप्नवत वाटत होते. मामाने आधार दिल्याने शिकण्याचा मार्ग मोकळा झाला. आता मामाच असमर्थ असल्याने पुढे अंधार दाटला आहे. चांगले शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षातून नोकरीवर लागण्याची इच्छा आहे. पैशाअभावी सारे कठीण वाटते आहे. 
- सुवर्णा कोटजावळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com