तेरा महिन्यांनंतर फुलला अंबाझरीत आनंद!

Swimming-Tank
Swimming-Tank

नागपूर - नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या तेरा महिन्यांपासून बंद असलेला अंबाझरी येथील नागपूर सुधार प्रन्यासचा जलतरण तलाव अखेर आज एक एप्रिलला खेळाडू व सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा सुरू झाला. उशिरा का होईना चांगला, दर्जेदार ‘स्विमिंग पूल’ मिळाल्याने जलतरणपटू आनंदात आहेत. पहिल्या दिवशी शेकडो जलतरणपटूंनी पोहण्यासाठी तलावावर गर्दी केली होती. 

नागपुरातील विविध जलतरण तलावांवर दररोज सकाळ-सायंकाळ शेकडो हौशी व व्यावसायिक जलतरणपटू नियमित सराव करतात. मात्र, दर्जेदार सुविधांमुळे अंबाझरी येथील तलाव त्यांचे आवडते ठिकाण बनले. परंतु, शहरातील या एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तलावावर जलतरणपटूंना आणखी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रन्यासने गतवर्षी नूतनीकरणाचा निर्णय घेताना एक फेब्रुवारी २०१७ पासून हा तलाव सरावासाठी पूर्णपणे बंद ठेवला होता. त्याअगोदरही ‘मल्टिपरपज बिल्डिंग’ बांधण्याच्या नावाखाली ऑक्‍टोबर २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत या तलावावर शुकशुकाट होता. मात्र, नूतनीकरणाचे काम अतिशय संथगतीने झाल्याने निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे शहरातील युवा जलतरणपटू व प्रशिक्षकांसह सर्वसामान्य नागपूरकरांना प्रचंड फटका बसला.

ऐन स्पर्धा काळात अनेकांना सरावासाठी इकडून तिकडे भटकंती करावी लागली होती. ५० मीटर लांबीऐवजी २५ मीटरच्या तिरपुडे, महाराजबाग, बालजगत, ऑफिसर्स क्‍लबमधील तलावांचा नाइलाजाने पर्याय निवडावा लागला. त्यामुळे सरावावर व कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरणपटूंनी तशा भावना व्यक्‍त केल्या होत्या. 
रेंगाळलेले काम लवकरात लवकर सुरू होऊन जलतरणपटूंना त्यांचा हक्‍क मिळावा, यासाठी एनआयटी स्विमिंग पूल मेंबर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन वाजपेयी यांनी वेळोवेळी आंदोलन केले. ‘सकाळ’नेही वारंवार वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. गेल्या २० मार्चच्या अंकातही ‘आम्ही पोहायला जायचे कुठे’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करून नागपुरातील जतलरणपटूंच्या व्यथा मांडल्या होत्या. तेरा महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना अंबाझरी तलाव सुरू झाल्याने आता शहरातील जलतरणपटू खुश आहेत. नुंतनीकरणानंतर तलावाचे एकूणच रूप पालटले असून, सर्व सोयीनिशी ऑलिम्पिक दर्जाचा ‘पॉश’ तलाव मिळाल्याची प्रतिक्रिया काही जलतरणपटूंनी व्यक्‍त केली. 

निडहॅम पार्कमधील तलावाचे काय?
अंबाझरीप्रमाणेच कॉटन मार्केट परिसरातील निडहॅम पार्कमध्ये बांधण्यात आलेला महापालिकेचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जलतरण तलावही देखभालीसाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. रघुजीनगर व मेडिकलनंतर हा पूर्व नागपुरातील सर्वांत चांगला जलतरण तलाव आहे.  उन्हाळ्यामध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्या राहात असल्यामुळे जलतरणासाठी हा सर्वांत ‘पीक पीरिअड’ मानला जातो. त्यामुळे महापालिकेने तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पूर्व नागपुरातील जलतरणपटूंना दिलासा द्यावा, अशी ‘सकाळ’शी भूमिका आहे.

‘उशिरा का होईना खेळाडूंना त्यांचा हक्‍क मिळत असल्याचा मनापासून आनंद आहे.  नूतनीकरणाचे काम चांगले झाले असले तरी, ‘ओझोन सिस्टीम’ अद्याप लागलेली नाही. प्रशासन पुन्हा टेंडर मागविणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मी सोमवारी व्यक्‍तीश: संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. ’ 
- मनमोहन वाजपेयी (अध्यक्ष, एनआयटी स्‍वीमिंग पूल मेंबर्स असोसिएशन) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com