शिक्षकांना फक्त शिकवू द्या, ऑनलाइन कामे रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नागपूर - शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील ऑनलाइन कामे रद्द करा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी शहरात हजारो शिक्षक राज्य सरकारविरोधात रस्त्यावर आले. यशवंत स्टेडियम ते व्हेरायटी चौकापर्यंत लांब असलेल्या मोर्चात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षकांना फक्त शिकवू द्या, अशी मागणी करण्यात आली.

नागपूर - शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील ऑनलाइन कामे रद्द करा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी शहरात हजारो शिक्षक राज्य सरकारविरोधात रस्त्यावर आले. यशवंत स्टेडियम ते व्हेरायटी चौकापर्यंत लांब असलेल्या मोर्चात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिक्षकांना फक्त शिकवू द्या, अशी मागणी करण्यात आली.

नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचे नेतृत्व समन्वय समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केले. मागील सात ते आठ महिन्यांपासून शिक्षकांच्या बदल्यांचा विषय राज्यभर गाजत आहे. दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यातच होतात आणि जि. प.चे कर्मचारी व शिक्षक यांच्या बदल्या एकाच शासन निर्णयानुसार होतात. या वर्षी पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्या स्वतंत्र शासन निर्णयानुसार आणि ऑनलाइन पद्धतीने करण्याचे राज्य सरकारने ठरवले. आज सात आठ महिने लोटूनही बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

दरम्यान, या बदली धोरणात काही दुरुस्ती कराव्यात, या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. परंतु, सरकार काहीही ऐकायला तयार नाही. दुसरीकडे, मागील चार-पाच वर्षांपासून शिक्षकांच्या मागे ऑनलाइन कामाचा ससेमिरा सुरू आहे. शाळेत कोणत्याही साधनसुविधा नसताना अनेक अशैक्षणिक स्वरूपाची कामे ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांना करावी लागतात. ही कामे शिक्षकांकडून करणे थांबवावे व ती कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावी, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून राज्यभर शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन सुरू आहे. 

मागील काही वर्षांपासून नोव्हेंबरपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, यासाठी सतत आंदोलन सुरू आहे. त्यातच वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीबाबत जाचक अटी असलेला शासन निर्णय शासनाने निर्गमित केला. त्यामुळे शिक्षकांमधील असंतोष अधिकच वाढला. मोर्चानंतर झालेल्या सभेत शिक्षक नेत्यांची जोरदार भाषणे झाली. लीलाधर ठाकरे, सुनील पेटकर, सुनील पाटील, तुषार अंजनकर, राजकुमार वैद्य, शरद भांडारकर, शेषराव कांबळे, स्वाती लोन्हारे यांनी आपले मत व्यक्त केले. शासनाने जर मागण्यांची दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देऊन संकलित चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय  घेण्यात आला. 

जुनीच पेन्शन योजना हवी
नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जुन्याच पेन्शन योजनेनुसार सेवानिवृत्तिवेतन देण्यात यावे व वरिष्ठ वेतन व निवडश्रेणी लागू करण्याकरिता जाचक अटी असलेल्या शासन निर्णय रद्द करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

Web Title: nagpur vidarbha news teacher teaching, online work