'पंक्‍या तू पगला है, तुने ये मिस किया...'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

तरुणांचे फेसबुक लाइव्ह; बुडण्याची भीती खरी ठरली

तरुणांचे फेसबुक लाइव्ह; बुडण्याची भीती खरी ठरली
नागपूर - गौंडखैरीजवळील वेणा जलाशयात बुडालेल्या तरुणांच्या मृत्यूने उपराजधानीत हळहळ व्यक्त होत असतानाचा मृत्यूच्या काही वेळापूर्वी या तरुणांनी केलेले "फेसबुक लाइव्ह' सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नौकाविहाराचा आनंद घेत पंकज नावाच्या एका मित्राला "पंक्‍या तू पगला है, तुने ये मिस किया...' या शब्दांमध्ये चिडवणारे हे युवक काही क्षणातच मृत्यूच्या कवेत जातील याचा कुणालाही अंदाज नव्हता.

पंकज डोईफोडे याच्या फेसबुक पेजवर 9 जुलै 2017 रोजी सायंकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी "फेसबुक लाइव्ह' करण्यात आले. पाच मिनिटे 57 सेकंदांच्या लाइव्ह व्हिडिओद्वारे या तरुणांनी मित्रांसोबत ऑनलाइन संवाद साधला. या वेळी त्यांच्या काही मित्रांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. एवढेजण नावेत कसे बसला आहात, असे विचारून बुडण्याची भीती व्यक्त केली होती. ही भीती अखेर खरी ठरली. नावेचे संतुलन बिघडल्यामुळे झालेल्या अपघातात या तरुणांना जीव गमवावा लागला.
नावेत बसूनच या तरुणांनी पंकज नेरकर या मित्राशी "फेसबुक लाइव्ह'द्वारे संवाद साधला. या व्हिडिओमध्ये पंकज, तू आला नाहीस आम्ही "मिस' केले, असे त्याने म्हटले आहे. "नजारा देख, नजारा...' असे म्हणत तो जलाशयातील पाणी फेसबुकवरील मित्रांना दाखवितो.

नावेतील तरुणांची फेसबुकवरून मित्रांशी संवाद साधताना धडपड सुरू असताना एक तरुणाने "हलू नका' भीती वाटते, असे म्हटल्याचे ऐकू येते. दुसऱ्या तरुणाने "पाणी पाणी' हे गाणे म्हणायला सुरवात केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते; पण याच पाण्याने तरुणांचा घात केला अन्‌ ते पाण्यात बुडाले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

हळहळ अन्‌ खबरदारीही
पंकज डोईफोडे याच्या फेसबुक पेजवरील लाइव्ह व्हिडिओ अनेक नेटिझन्सनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ फेसबुकशिवाय इतरही सोशल माध्यमांद्वारे समाजापर्यंत पोचला आहे. यावर उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता अनेकांनी "तरुणाईच्या या उन्मादाला आळा घालायला हवा,' असे सांगत हळहळ व्यक्त केली; तसेच काहींनी अशा ठिकाणी सहलीला जाताना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: nagpur vidarbha news ten youth drowned in vena lake