‘टाय-अप’ महाविद्यालयांची होणार पुन्हा तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

शहरातील सात - पत्र देऊन विचारणार कारणे 

नागपूर - अकरावी-बारावीचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत नसले तरी त्याच वर्गातील मुलांच्या भरोशावर खासगी क्‍लासेसची दुकानदारी जोमात चालली असल्याचे स्पष्ट करणारी कारवाई शिक्षण खात्याने सुरू केली. सोमवारी (ता. ११) उपसंचालक कार्यालयातील पथकाने पुन्हा एकदा महाविद्यालयांची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यात पहिल्या तपासणीमधील नामांकित महाविद्यालयात ४२ विद्यार्थी आढळले. विशेष म्हणजे उद्या, मंगळवारी विभागातर्फे या महाविद्यालयाला दुसऱ्यांदा पत्र देत कारणे विचारली जाणार आहेत. 

अकरावी प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयात नियमित वर्ग सुरू झाले. त्यामुळे ज्या महाविद्यालयांचे क्‍लासेसशी ‘टाय-अप’ आहे, त्यांची तपासणी करण्यास शिक्षण विभागाने सुरुवात केली. १४ ऑगस्टला शहरातील चार महाविद्यालयांत नियमित वर्ग सुरू आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यापैकी एका महाविद्यालयातील वर्गात अत्यल्प प्रवेश असल्याचे आढळले. शिकवणी वर्गांशी साटेलोटे असणारी बरीच महाविद्यालये शहरात आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये खळबळ उडाली.

त्यातूनच काही महाविद्यालयांनी पालकांना सूचना देत, विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात पाठविण्यास सांगितले. याशिवाय क्‍लासेसशीही वाटाघाटी करून वेळांमध्ये बदल करून घेतले. मात्र, त्यानंतर पथकांकडून तपासणी मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा महाविद्यालयांच्या तपासणीस सुरुवात झाली. पथकाकडून शहरातील सात महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली. यात बहुतांश महाविद्यालयात ४० ते ७० टक्के उपस्थिती आढळली. मात्र, दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आलेल्या नामवंत महाविद्यालयात पुन्हा एकदा केवळ ४२ विद्यार्थी आढळून आले. त्यामुळे या महाविद्यालयाला पुन्हा एकदा विचारणा करणारे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नॅक समिती असल्याचा दावा
उपसंचालक कार्यालयातील पथकाने केलेल्या तपासणीत ४२ विद्यार्थी असल्याचे आढळले. त्यावर पथकाने विचारणा केली असता, महाविद्यालयात नॅक समिती असल्याने विद्यार्थी नसल्याचे कारण महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पथकाने वरिष्ठ महाविद्यालयासाठी नॅक असताना, कनिष्ठ महाविद्यालयातील मुले कशी गैरहजर आहेत, हा प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कुठलेही उत्तर मिळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news ti-up college return cheaking