शहरातील अनेक भागांत दूषित पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर - शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असून नगरसेवकांना नागरिकांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नगरसेवकांनी आज आयुक्त अश्‍विन मुदगल यांची भेट घेतली. आयुक्तांनी याप्रकरणी आठवड्याभरात याबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. 

शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठ्यात घट झाली आहे. पाणी वितरणातही भेदभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी केला. शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे, याकडेही शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले. नागरिक नगरसेवकांकडे सातत्याने या तक्रारी घेऊन येत आहेत. त्यामुळे नागरिकांना उत्तर देणे कठीण झाले आहे. सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याच्या समस्येपासून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आयुक्तांनी आठवड्याभरात यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.

नळाच्या पाण्यातून गांडूळ 
प्रभाग क्रमांक २६ मधील दर्शन कॉलनीत नळाच्या पाण्यातून गांडूळही येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून नेहरूनगर झोनला याबाबत तक्रार करीत आहेत. परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. सुदामनगरी येथील राजू बोंडे यांनीही दूषित पाण्याची तक्रार केली असल्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news uncleaned water