केंद्रीय प्रवेशाने येणार एकसूत्रता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरातील विभागांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी घेतला. यामुळे प्रवेश प्रक्रियेत एकसूत्रता येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरातील विभागांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी घेतला. यामुळे प्रवेश प्रक्रियेत एकसूत्रता येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

विद्यापीठ परिसरात विज्ञान, कला आणि अन्य शाखांचे विभाग आहेत. यात विदर्भ आणि अन्य राज्यांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. विज्ञान शाखेच्या सर्वच विभागांमध्ये प्रवेशासाठी मोठी मारामार असते. ही प्रवेश प्रक्रिया दरवर्षी विभागाच्या वतीने राबविण्यात येते. प्रत्येक विभाग प्रवेश अर्ज जमा करून त्यातील गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश देत असतो. मात्र, या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे कुलगुरूंच्या ध्यानात आले. हा अधिकार विभागांना दिल्याने यात मोठ्या प्रमाणात घोळ होण्याची शक्‍यताही वर्तविली जात होती. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व प्रवेश प्रक्रियेत एकसूत्रता आणण्याच्या हेतूने कुलगुरूंनी हे पाऊल उचलले आहे.

यासाठी कॅम्पसमधील सर्वच विभागांचे प्रवेश एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ यासाठी एक समिती तयार करणार असून, या समितीच्या अंतर्गत ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे, असेही कुलगुरूंनी सांगितले. या वेळी पुढल्या वर्षीपासून ऑनलाइन अर्ज मागविणार असल्याचे ते म्हणाले.

अशी असेल केंद्रीय पद्धती
पदव्युत्तर प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने केंद्रीय प्रवेश पद्धतीसाठी अर्ज करायचा आहे. त्याला ज्या ज्या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल, त्या त्या विभागांची नोंद प्रवेश अर्जावर करावी लागेल. यानंतर गुरुनानक हॉलमध्ये तीन दिवस प्रवेश प्रक्रिया राबवून गुणवत्तेच्या क्रमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण असेल, त्यांचे नाव ‘स्क्रीन’वर दिसेल. रिक्त असणाऱ्या विभागाची निवड विद्यार्थ्याला करावी लागेल. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोयीचे ठरणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news union Aid will come together