विद्यापीठाचे ‘ई-नोटीस बोर्ड’ ॲप

मंगेश गोमासे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

विद्यापीठाच्या दृष्टीने भविष्यात हे ‘ॲप’ फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलवर ते डाउनलोड केल्यास त्यांच्याशी निगडित सर्वच सूचना आणि परिपत्रके दिसून येतील. याचा फायदा त्यांना होईल.
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे दररोज नवे आदेश, सूचना आणि परिपत्रक काढण्यात येतात. यापैकी बऱ्याच सूचना, परिपत्रक व आदेश हे कार्यालयीन काम, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी निगडित असतात. मात्र, संकेतस्थळावर गेल्याशिवाय सूचना व परिपत्रकांची माहिती मिळत नाही. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने ‘नागपूर विद्यापीठ ई-नोटीस बोर्ड’ हे नवे ‘ॲप’ तयार केल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

विद्यापीठाद्वारे दररोज विविध विभागांशी संबंधित परिपत्रक काढण्यात येते. मात्र, हे परिपत्रक वा सूचना विद्यार्थी किंवा महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापकांपर्यंत पोहोचेलच अशी शाश्‍वती विद्यापीठ देऊ शकत नाही. कधी-कधी अधिकारी आणि विभागांशी संबंधित असलेले परिपत्रक व बैठकीची  सूचना ही सार्वजनिक होत असते. 

हे प्रकार टाळण्यासाठी विद्यापीठाने ‘रुसा’अंतर्गत ‘ॲप’ तयार केले. यासाठी रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. चांडक व विद्यापीठाच्या डॉ. वीणा प्रकाशे यांनी मदत केली.

गुगल प्लेस्टोरमधून ॲप डाउनलोड केल्यावर त्यात ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकताच विद्यापीठाकडून आलेले परिपत्रक व सूचना बघता येणार आहे. मात्र, यामधील गोपनियता जपण्यासाठी विद्यापीठाद्वारे कुलगुरू स्वत:चा ग्रुप तयार करून ग्रुपमध्ये एखादी सूचना शेअर करीत असल्यास त्यातील व्यक्तींनाच ती बघता येणार आहे. मात्र, एखादे परिपत्रक किंवा सूचना प्राध्यापक, प्राचार्य किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल, तर त्यांनाही ती वाचता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना हे ॲप डाउनलोड करावे लागणार आहे.

विशेष म्हणजे विद्यापीठाचे विभाग, अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांसाठी हे ॲप बरेच फायदेशीर ठरणार आहे. शिवाय महाविद्यालयीन कामकाजात प्राचार्यांनाही हे उपयुक्त ठरणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. मात्र, रिप्लाय करण्याची सोय त्यात उपलब्ध नसल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.

विभागात लावणार डिस्प्ले
ॲपच्या माध्यमातून विभागामध्ये सर्व प्रकारचे परिपत्रक वा सूचना देण्यासाठी विद्यापीठाकडून येणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीत विभागांत इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिस्प्ले लावण्यात येईल. यासाठी प्रत्येक विभागाला संगणक देण्यात येईल. त्याचे कंट्रोलिंग विभागप्रमुख करणार आहे. यातून विभागाला सूचना व परिपत्रकांची माहिती मिळेल. शिवाय विद्यापीठ परिसरात लवकरच असे सहा डिस्प्ले लावणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

Web Title: nagpur vidarbha news university e-notice board app