विद्यापीठाची सुरक्षा पुन्हा खासगी यंत्रणेकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नागपूर - पगारवाढ आणि नोकरीवर कायम करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी संप पुकारला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दोन महिन्यांआधीच या दलाची सुरक्षा स्वीकारली आहे. २५ वर्दीधारी जवान विद्यापीठ प्रशासकीय इमारतीभोवती तैनात असतात. मात्र, सुरक्षारक्षकांनी संप पुकारल्यामुळे विद्यापीठाच्या संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी विद्यापीठावर पुन्हा खासगी सुरक्षा यंत्रणेकडून सुरक्षारक्षक मागविण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बल ही कंपनी येते. कंत्राटी पद्धतीने तिचे काम चालते. मेट्रो, विमानतळ, टोल नाके आदी विभागांसह विद्यापीठांमध्येही ही कंपनी सुरक्षा पुरविते. विद्यापीठांमध्ये वाढत्या अवैध विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाने हा पवित्रा घेतला होता. त्यानुसार विद्यापीठाने दोन महिन्यांपूर्वीच महाराजबाग येथील प्रशासकीय परिसरात ‘महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्स’ची सेवा घेतली. विद्यापीठाने प्रशासकीय परिसरात जवळपास २५ वर्दीधारी जवान तैनात केले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय परिसराप्रमाणेच वसतिगृह आणि परीक्षा भवनात १८ सप्टेंबरपासून ही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येणार होती. मात्र, फोर्सच्या जवानांनी संप पुकारल्याने विद्यापीठाला वसतिगृहांमध्ये सुरक्षा यंत्रणा लावण्याचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला. त्यानुसार कुलगुरू, प्र-कुलगुरू कक्षासह इतर सर्वच ठिकाणी विद्यापीठाने तीन खासगी सुरक्षा कंपन्यांचे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मात्र, विद्यापीठाने कोट्यवधी रुपये खर्च करून ज्या विश्‍वासाने या कंपनीशी करार केला होता, त्यावर पाणी पडले हे निश्‍चित आहे.

संघटनांचा मोर्चा आल्यास काय?
काही दिवसांआधी विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढला होता. या वेळी मोर्चेकरी सरळ कुलगुरूंच्या कक्षापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. तर, याआधी काही विद्यार्थी चक्क सायकल घेऊन कुलगुरूंच्या कक्षात घुसले होते. त्यामुळे सुरक्षा दलाच्या संपाच्या काळात मोठा मोर्चा झाल्यास काय, हा प्रश्‍न पुढे येत आहे.

विद्यापीठाने सध्या खासगी सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीचा संप होताच ते जवान पुन्हा पूर्ववत तैनात होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेवर कुठलाही फरक पडणार नाही.
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

Web Title: nagpur vidarbha news university security private company