पहिल्या दिवशी विदर्भ बंदची हाक

पहिल्या दिवशी विदर्भ बंदची हाक

नागपूर - वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने उद्या, सोमवारी बंदची हाक दिली आहे. विदर्भ बंद आंदोलनासाठी माजी मंत्री दत्ता मेघे, रणजित देशमुख, नितीन राऊत यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे समर्थन असल्याचा दावा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीसह शहरातील संघटना एकत्र येणार आहेत. उद्या, ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विदर्भवादी नेते व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येतील. येथून सीताबर्डी येथील दुकाने, प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येईल. याबाबतचा निर्णय आज गिरीपेठ येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत विदर्भवादी संघटना, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्या शेतकरी संपावर जाणार असून बेरोजगार रस्त्यांवर उतरतील, असा दावा यावेळी करण्यात आला. विदर्भाच्या मागणीबाबत भाजपने घुमजाव केल्याने तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याप्रकरणी जनतेत  असंतोष आहे. याचे पडसाद उद्या नागपुरात उमटण्याची शक्‍यता आहे. या बंदला विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पक्ष, जनमंच, विदर्भ माझा, विदर्भ गण परिषद, विदर्भ कनेक्‍ट, रिपब्लिकन पार्टी (आठवले), आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सुरेश माने, माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या विदर्भ विकास परिषद, बहुजन सेना, बळीराजा पार्टी, जनसुराज्य पार्टी, नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स, टायगर ऑटो संघटना, झोपडपट्टी समस्या निवारण संघ, आमदार रवी राणा, माजी मंत्री नितीन राऊत, रणजित देशमुख, नगरसेवक जुल्फीकार अली भुट्टो, रमेश पुणेकर, अनिल अहीरकर, ज्वाला धोटे आदी नेते, संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे राम नेवले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com