मतदारयादीचे एक पान, एक प्रमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - शहर भाजपने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार केली असून, अंमलबजावणीही सुरू केली. भाजपने मतदारयादीतील एका पानासाठी एक प्रमुख नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. रणनीतीद्वारे १०० टक्के मतदान मिळविण्याचा प्रयत्न आहे. 

नागपूर - शहर भाजपने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार केली असून, अंमलबजावणीही सुरू केली. भाजपने मतदारयादीतील एका पानासाठी एक प्रमुख नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. रणनीतीद्वारे १०० टक्के मतदान मिळविण्याचा प्रयत्न आहे. 

शहर भाजपची आज गणेशपेठ येथील पक्षाच्या कार्यालयात शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या भोवतीच बैठकीत खल झाला. शहरात १९१४ बूथवर मतदारयादीतील पानाचे प्रमुख नियुक्त केले जाणार आहे. एका बूथसाठी २५ कार्यकर्त्यांची टीम तयार केली जाणार असल्याचे आमदार कोहळे यांनी सांगितले. या पथकाची कामे, त्यांची जबाबदारी याबाबत मुंबईतील पक्षाच्या वॉररूमशी त्यांना जोडण्यात येणार आहे. सामान्य कार्यकर्त्याला पद मिळाल्याचे समाधान मिळणार असून, पक्षाच्या कार्यात स्वयंस्फूर्तीने स्वतःला झोकून देईल, असा भाजप पदाधिकाऱ्याचा या रणनीतीमागील हेतू असल्याचे समजते. या पेजप्रमुख अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. १५ ऑक्‍टोबरपर्यंत सर्वच बूथवरील पेजप्रमुख नियुक्त करण्यात येतील. आज या अभियानाच्या ५१ प्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शहर भाजपसह प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक, युवा मोर्चा, महिला आघाडीच्या वेगवेगळ्या बैठका पार पडल्या. बैठकीत महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटनमंत्री भोजराज डुंबे, दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, दिलीप गौर, किशन गावंडे, डॉ. कीर्तिदा अजमेरा, शिवानी दाणी आदी उपस्थित होते.

केरळमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या  
केरळमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या विरोधात शहर भाजपने उद्या, सोमवारी दुपारी ४ वाजता संविधान चौकात निषेध सभा आयोजित केली आहे. या सभेत शहरातील सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, मनपातील पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: nagpur vidarbha news voter list