खंडित वीजपुरवठ्याने पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

नागपूर - गेल्या दीड महिन्यात नवेगाव खैरी व कन्हान पम्पिंग स्टेशनवर सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अनेकदा शहरातील जलवाहिन्यातही पाणी नसल्याने लागूनच असलेल जीर्ण सिवेज लाइनचे पाणी त्यात शिरत असून, काही भागांत दूषित पाणीपुरवठाही होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. 

नागपूर - गेल्या दीड महिन्यात नवेगाव खैरी व कन्हान पम्पिंग स्टेशनवर सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अनेकदा शहरातील जलवाहिन्यातही पाणी नसल्याने लागूनच असलेल जीर्ण सिवेज लाइनचे पाणी त्यात शिरत असून, काही भागांत दूषित पाणीपुरवठाही होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. 

गेल्या दीड महिन्यात ओसीडब्ल्यूच्या कॉलसेंटरवर कमी पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा तसेच पाणी का आले नाही, अशा प्रश्‍नांची सरबत्ती नागरिक करीत आहेत. शहरवासींना पाणीपुरवठ्याचा पूर्ण प्रयत्न ओसीडब्ल्यू व महापालिका करीत आहे. परंतु, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी येथील पम्पिंग स्टेशनवर १ मे ते १५ जून या काळात १६ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. 

यात एकूण ४१ तास २५ मिनिटे पम्पिंग स्टेशन बंद राहिले. कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रात याच काळात ४९ वेळा वीजपुरवठा खंडित झाला असून, १८ तास १५ मिनिटे पम्पिंग स्टेशन बंद होते. १३६ एमएलडी क्षमतेच्या पेंच-१ जलशुद्धीकरण केंद्रात ११, १४५ एमएलडी क्षमतेच्या पेंच-२ केंद्रात ५, १२० एमएलडी क्षमतेच्या पेंच-३ केंद्रात ८ तर १६ एमएलडी क्षमतेच्या जुना गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात १४ वेळा वीजपुरवठा खंडित झाला.

वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पम्पिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बराच काळ लागतो. पाण्याचा प्रवाह नसल्याने जलवाहिनीत हवा निर्माण होऊन ती काढून जलकुंभ भरण्यासाठी जवळपास ४ तासांचा कालावधी लागत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

जलकुंभात सतत पाण्याचा प्रवाह सुरू असतो. परंतु, पाच मिनिटेही वीजपुरठा खंडित झाल्यास जलकुंभाची पातळी कमी होऊन परिसरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात शहरातील पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. पम्पिंग स्टेशनवर पाच मिनिटे वीजपुरवठा खंडित झाल्यास अपेक्षित जलप्रवाहासाठी पम्पिंग सुरू झाल्यानंतरही अडीच तासांचा कालावधी लागत असल्याचे तज्ज्ञाने सांगितले.

टॅंकर पुरविणेही कठीण
मागील दीड महिन्यात सातत्याने हीच स्थिती असल्याने शहरात टॅंकरच्या मागणीतही वाढ झाली. परंतु, अचानक या स्थितीमुळे टॅंकर पुरविणेही कठीण झाल्याने शहरावर पाणीसंकट निर्माण झाले.

Web Title: nagpur vidarbha news water shortage by electricity supply