संशयावरून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नागपूर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने लाकडी बांबूने डोक्‍यावर वार करून खून केला. हा थरार आज शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कळमन्यात घडला. ममता एकनाथ कोहळे (वय २२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी पती एकनाथ हा सध्या फरार आहे.

नागपूर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने लाकडी बांबूने डोक्‍यावर वार करून खून केला. हा थरार आज शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कळमन्यात घडला. ममता एकनाथ कोहळे (वय २२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी पती एकनाथ हा सध्या फरार आहे.

एकनाथ काशिनाथ कोहळे का मजूर असून, त्याचा चार वर्षांपूर्वी ममताशी विवाह झाला होता. त्यांच्या संसार वेलीवर दोन फुले असून सर्व काही सुरळीत सुरू होते. दरम्यान, एकनाथला दारूचे व्यसन जडले. त्यामुळे पत्नी ममताशी नेहमी वाद होत होते. गेल्या काही दिवसांपासून तो ममताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये अनेकदा कडाक्‍याचे भांडण झाले होते. तसेच त्याने ममताला जबर मारहाणही केली होती. रोजच्या कटकटीला कंटाळून ममता दोन्ही मुलांसह माहेरी निघून गेली. त्यामुळे एकटा राहणाऱ्या एकनाथने घरातील अनेक वस्तू विकून दारू पिण्यास सुरुवात केली. शुक्रवारी एकनाथ हा पत्नीला भेटायला सासरी गेला. तेथेही दोघांमध्ये बराच वाद झाला. ती सोबत यायला तयार नव्हती. मात्र, एकनाथने यापुढे दारू न पिता चारित्र्यावर संशय न घेण्याचे आश्‍वासन दिले.

त्यामुळे ममताच्या आई-वडिलांनी पतीसह पाठवले. रात्री दहा वाजताच्या सुमारास एकनाथ पुन्हा दारू पिऊन घरी आला. त्याने ममतावर पुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन वाद उपस्थित केला. दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले तसेच एकनाथने तिला मारहाण केली. दोघेही जेवण न करता झोपून गेले. पहाटे चार वाजताच्या सुमारास एकनाथ उठला आणि दारू पिऊ लागला. त्यामुळे ममताने पुन्हा वाद घातला. त्यामुळे एकनाथने घरातील बांबू काढून तिला झोडपण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्‍यावर जबर वार केल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. आरडाओरडा केल्यामुळे शेजारी जागे झाले. त्यांनी जखमी ममताला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी तक्रारीवरून एकनाथवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तो पहाटेपासूनच फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

प्रेमविवाहाचा करुण अंत
एकनाथ आणि ममता हे दोघेही शेजारी राहत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. ओळखीनंतर मैत्री आणि प्रेमात रूपांतर झाले. दोघांनीही घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला. मात्र, सुखी संसारात संशयाने घर केले. त्यामुळे एकमेकांवरील विश्‍वास तुटला. त्यामुळे प्रेमविवाहाचा असा करुण अंत झाला.

एकनाथवर घरफोडीचे २४ गुन्हे
एकनाथ हा अट्‌ल चोरटा आहे. त्याच्यावर कळमना पोलिस ठाण्यात घरफोडीचे २४ गुन्हे दाखल आहेत. यासोबतच त्याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती आहे. तो रात्री उशिरा घरी येत असल्यामुळे पत्नीचाही संशय बळावला होता. एकनाथने शहरात इतरही ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती कळमना पोलिसांनी दिली.

Web Title: nagpur vidarbha news wife murder on suspected