दक्षिण मध्यच्या युवा संगीत स्पर्धेला ‘ब्रेक’!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

तिसऱ्याच वर्षी पडला खंड - खर्च कमी करण्यासाठी शक्कल
नागपूर - देशभरातील युवा शास्त्रीय संगीतकारांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पीयूष कुमार यांनी सुरू केलेली शास्त्रीय संगीत स्पर्धा यंदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत तिसऱ्याच वर्षी खंड पडल्यामुळे  कलावंतांची निराशा झाली आहे. खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने केंद्राने स्पर्धेतून हात वर केल्याचे बोलले जात आहे.

तिसऱ्याच वर्षी पडला खंड - खर्च कमी करण्यासाठी शक्कल
नागपूर - देशभरातील युवा शास्त्रीय संगीतकारांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पीयूष कुमार यांनी सुरू केलेली शास्त्रीय संगीत स्पर्धा यंदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत तिसऱ्याच वर्षी खंड पडल्यामुळे  कलावंतांची निराशा झाली आहे. खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने केंद्राने स्पर्धेतून हात वर केल्याचे बोलले जात आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकपद स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच वर्षी डॉ. पीयूष  कुमार यांनी या स्पर्धेची घोषणा केली. हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताच्या कलावंतांसाठी ही स्पर्धा घेण्यात येते. दोन वर्षांपूर्वी स्पर्धा सुरू झाली तेव्हा विजेत्याला ५१ हजार रुपये आणि  द्वितीय स्थान पटकाविणाऱ्याला ३१ हजारांचे पारितोषिक दिले. गेल्यावर्षी स्व. डॉ. वसंतराव देशपांडे संगीत समारोहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तीन सर्वोत्तम कलावंतांना दोन लाखांचे पारितोषिक दिले.

याशिवाय विजेत्यांना देशपांडे संगीत समारोहात सादरीकरणाची संधीही दिली जाणार होती. यंदा ही स्पर्धाच होणार नसल्याचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. परंतु, गेल्यावर्षीच्या विजेत्यांना यंदाच्या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळण्याची मात्र शक्‍यता आहे. विशेष म्हणजे देशभरातील कलावंतांना स्पर्धेच्या निमित्ताने नागपुरात खेचून आणणारा हा उपक्रम होता. 

मात्र, तिसऱ्याच वर्षी खंड पडल्यामुळे आता या स्पर्धेचे भवितव्य अंधारात आहे. दोन वर्षे देशपांडे संगीत समारोहाच्या पूर्वी म्हणजेच जुलैच्या तिसऱ्या किंवा  चौथ्या आठवड्यात ही स्पर्धा झाली. यंदा यासंदर्भातील कुठलीही घोषणा न झाल्यामुळे ही बाब उघडकीस आली.

संगीत समारोहातही काटकसर
स्व. डॉ. वसंतराव देशपांडे संगीत महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी आयोजनात अव्वाच्या सव्वा खर्च केल्यानंतर यंदा दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रापुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या महोत्सवात खर्चाला कात्री मारून केंद्राचा ‘ॲडजस्टमेंट’वर जोर असणार आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. काही निवडक कलावंतांच्या मानधनावर २५ लाखांचा खर्च केला. मात्र, काही महिन्यांपासून लोककलावंतांचे मानधन रखडले असताना व्यावसायिक कलावंतांच्या मानधनावर अव्वाच्या सव्वा खर्च करणे केंद्राच्या अंगलट येऊ शकते. त्यामुळे काटकसर करणे किंवा लोककलावंतांच्या मानधनावर  डल्ला मारणे, हे दोनच पर्याय केंद्रापुढे आहेत. ३०, ३१ जुलै व १ ऑगस्ट असे तीन दिवस   डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा महोत्सव होणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news youth music competition break